मानवी अस्तित्वासाठी तंत्रज्ञान विकसित करा - डॉ. अरविंद नातू

राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात डॉ. अरविंद नातू यांनी  'निसर्ग आणि विज्ञान' या विषयावर व्याख्यान दिले.

मानवी अस्तित्वासाठी तंत्रज्ञान विकसित करा - डॉ. अरविंद नातू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नागरिकांनी चिकित्सकवृत्तीने निसर्गाचे निरीक्षण (Observation of nature) करुन त्यामधून सतत अध्ययन करीत राहावे. स्वतः ला का ? कधी ? कसे ? असे प्रश्न विचारत राहावे. तसेच मानवी अस्तित्वासाठी तंत्रज्ञान (Technology) विकसित करावे,असे मत आयसर येथील वैज्ञानिक डॉ.अरविंद नातू  (Scientist Dr. Arvind Natu) यांनी व्यक्त केले. 

पुण्यातील बालेवाडी येथील  शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित ५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात डॉ. अरविंद नातू यांनी  'निसर्ग आणि विज्ञान' या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, निर्सगाच्या निरीक्षणातूनच 'वेलप्रो'चा शोध लागला. तसेच बुलेट ट्रेनचे इंजिन निर्माण करताना 'किंगफिशर' या पक्षाच एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात  प्रवेश करताना आवाज न करण्याच्या पद्धतीचा उपयोग झाला. रोबो निर्माण करताना झुरळासारख्या छोट्या किटकाने संकटाच्यावेळी स्वत:ची लांबी ५० टक्क्यापर्यंत करणे या संकल्पनेचा उपयोग करण्यात आला आहे. निरीक्षणाद्वारे अशा वैज्ञानिक गोष्टींचे आकलन होऊ शकते. 

हेही वाचा : शिक्षक भरती : गणित विषयाच्या जागा रिक्ताच राहणार ; इतर विषयाच्या जागांचे काय होणार ?

यावेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे उपस्थित होते. प्रदर्शनात विविध राज्यातील प्राध्यापकांनी विज्ञान प्रदर्शनाबाबत सुरु असलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली. यामध्ये हिमाचल प्रदेश येथील डॉ. हेमंत कुमार, चंदीगडचे मनू शर्मा, नागालँडचे श्रीमती विसेतोनुओ अंगमी, मणिपूरचे ओनिनाम सिंग, आसामचे नितुल दास, बिहारचे कृष्णा कुमार, झारखंडच्या प्रिती मिश्रा, अंदमान- निकोबारचे राजेश कुमार, लडाखचे युसूफ अली आदींनी सहभाग घेतला. 

 राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी प्रदर्शनाला  २ हजार ७०० विद्यार्थी आणि १४० शिक्षकांनी प्रदर्शनास भेट दिली. यावेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक येडगे यांनी प्रदर्शनात मांडलेल्या अविष्काराबद्दल माहिती घेतली. तसेच कराड येथील यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हे प्रदर्शन ३० डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहे. अधिकाधिक नागरिक, शिक्षक, विद्यार्थी व विज्ञानप्रेमी नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन येडगे यांनी केले आहे.