आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी.. प्रदीप पावरा अनुसूचित जमाती प्रवर्गातून  राज्यात दुसरा

विक्रिकर निरीक्षक वर्ग २ पदासाठी प्रदीप पावरा हा अनु. जमाती प्रवर्गातून  राज्यात दुसरा आला.

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी..  प्रदीप पावरा अनुसूचित जमाती प्रवर्गातून  राज्यात दुसरा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहातील (Government Hostel for Tribal Children) विद्यार्थी चमकदार कामगिरी करत असल्याने हे वसतिगृह प्रकाश झोतात आले आहे. वसतीगृहातील विद्यार्थी विशाल मेश्राम (Vishal Meshram) याला बेंगलोर येथील नामांकित महाविद्यालयात स्काॅलरशीप व प्रवेश मिळालाअसून विक्रिकर निरीक्षक वर्ग २ पदासाठी प्रदीप पावरा (Pradeep Pawara) हा अनु. जमाती प्रवर्गातून  राज्यात दुसरा आला आहे. त्यामुळे हे आदिवासी वसतीगृह आदिवासी युवकांचे विकास केंद्र बनत चालले आहे.   

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाची मुलांच्या शिक्षणाकरीता असणारी महत्वपुर्ण योजना म्हणजे आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह मागील कित्येक दशके हे वसतीगृह आंदोलन, उपोषण व मोर्चामुळे नेहमीच चर्चेत राहत होते, परंतु, आदिवासी विकास विभागातील बदलामुळे सद्या हे चित्र बदलताना दिसत आहे. आता हे आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह आदिवासी युवकांचे विकास केंद्र बनले आहे. राज्यातील आदिवासी मुलांसाठी उभे केलेले पहिले वसतीगृह असुन याची स्थापना सन 1979 मध्ये करण्यात आली आहे. साधारण 50 वर्षापासून हे वसतीगृह आदिवासी युवकांच्या विकासाकरीता अविरत कार्यरत असून अनेक विद्यार्थी या वसतीगृहातून घडले आहेत. 

वसतीगृहात उदय महाजन हे गृहपाल म्हणून रूजू झाल्यापासुन या वतसीगृहात विविध उपक्रम राबवले जातात. या काळात विद्यार्थाच्या सर्वागीण विकासावर भर देण्यात आली आहे. याचे फलित म्हणून मागील काही वर्षात बहुतांश विद्यार्थी बॅके अधिकारी, तलाठी, पोलीस शिपाई, MBBS मध्ये सरकारी महाविद्यायात प्रवेशित झाले असून गांधी फेलोशीप सारखे अनेक फेलोशीपला विद्यार्थी पात्र ठरले आहेत. नुकतेच येथील विशाल मेश्राम (पदवी कला) या विद्यार्थ्यास अझीम प्रेमजी महाविद्यालय बेंगलोर येथे स्काॅलरशीप व प्रवेश मिळाली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाव्दारे प्रसिद्ध झालेल्या निकालातून हे प्रसिद्ध झाले आहे.  

विक्रीकर निरीक्षक वर्ग 2 पदा करीता या वसतीगृहाचा विद्यार्थी प्रदीप पावरा हा अनु.जमाती प्रवर्गा मधून राज्यात दुसरा आला आहे. सध्या हे वसतीगृह इमारत क्षमते अभावी 60 विद्यार्थाना प्रवेश देऊ शकते. पुणे शहराच्या मध्यवर्ती असणा-या या वसतीगृहाकडे लोक प्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देऊन 250 विद्यार्थी क्षमतेचे भव्य व सर्व सोयीने सुसज्य वसतीगृह निर्मीत करणेबाबत आदिवासी युवकांकडून मागणी करण्यात येत आहे.