मुंबई विद्यापीठाचा रशियातील  विद्यापीठाशी शैक्षणिक सामंजस्य करार

मुंबई विद्यापीठाने रशियातील मास्को स्टेट विद्यापीठाशी शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे.

मुंबई विद्यापीठाचा रशियातील  विद्यापीठाशी शैक्षणिक सामंजस्य करार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षक आदान –प्रदान, विविध विद्याशाखातील शैक्षणिक कार्यक्रम, विविध ज्ञानशाखांत संशोधन, सह सांस्कृतिक कार्ये आणि शैक्षणिक साहित्य-संसाधन निर्मिती व हस्तांतरण अशा विविध क्षेत्रातील संधी डोळ्यासमोर ठेवून मुंबई विद्यापीठाने रशियातील मास्को स्टेट विद्यापीठाशी शैक्षणिक सामंजस्य करार (University of Mumbai signs academic MoU with Moscow State University, Russia) केला आहे. या करारान्वये दोन्ही विद्यापीठांदरम्यान विद्यार्थी- दालन  खुले होणार आहे.

मुंबई विद्यापीठ आणि मास्को स्टेट विद्यापीठ रशिया या उच्च शिक्षण संस्थामध्ये झालेल्या करारानुसार दोन्ही विद्यापीठातील प्राध्यापक आणि संशोधक परिषदा, कार्यशाळा आणि व्याख्यानात सहभागी होऊ शकतील तसेच अध्ययन आणि संशोधनासाठी एकत्रिक कार्य करू शकतील. याच कराराच्या अनुषंगाने स्मार्ट डिजीटल लर्निंग, सांस्कृतिक समन्वय आणि सहकार्यासाठी मुंबई विद्यापीठात व्याख्यान कक्षाच्या निर्मितीसाठी मास्को स्टेट विद्यापीठाने स्वारस्य दाखवले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना अनुभवात्मक आणि कौशल्य प्रशिक्षण, श्रेणी हस्तांतरण, दुहेरी पदवी, सह पदवी, ऑनलाईन आणि प्रत्यक्ष इंटर्नशिप, कृत्रिम बुद्धीमत्ता व इतर प्रगत ज्ञानशाखात अध्ययन व संशोधन व्हावे यासाठी मुंबई विद्यापीठाने विविध देशासोबत शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत.

"वैश्विक ज्ञानाच्या देवाणघेवाण प्रक्रियेमुळे विविध देशांतील शिक्षण प्रणालींमध्ये विकसित होत असलेल्या परस्परसंवादाद्वारे विद्यार्थ्यांना या कराराअंतर्गत याचा फायदा होणार असून, यामुळे सर्वोत्कृष्ट शैक्षणिक आणि संशोधन पद्धतींच्या सामायिकरणास प्रोत्साहन मिळू शकेल," असा आशावाद मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला.