विज्ञानकथा लेखनाचा प्रभाव शास्त्रज्ञांवर पडतो

विज्ञानातील क्लिष्ट संज्ञा आणि संकल्पना मराठी भाषेत लिहून सर्वसामान्यांपर्यंत विज्ञान पोहचवण्याचे काम डॉ. संजय ढोले करत आहेत.

विज्ञानकथा लेखनाचा प्रभाव शास्त्रज्ञांवर पडतो

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आभासी वास्तव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांची मुळं ही थेट विज्ञानसाहित्यात आहेत. विज्ञानकथा लेखनाचा प्रभाव शास्त्रज्ञांवर पडतो आणि विज्ञानातील शोध लागत जातात. त्यामुळे समाजात विज्ञानाचा प्रचार-प्रसार करणं गरजेचं आहे,असे मत एम. के.सी. एल. चे मुख्य मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत (Dr. Vivek Sawant)यांनी व्यक्त केले. 

शब्दाली प्रकाशनातर्फे  प्रसिद्ध केलेल्या सक्षम समीक्षेच्या 'विज्ञानलेखक डॉ. संजय ढोले साहित्य विशेषांका' (Dr. Sanjay Dhole)च्या प्रकाशन समारंभ प्रसंगी डॉ. विवेक सावंत पुण्यात बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि ज्येष्ठ विज्ञानसाहित्यिक डॉ. पंडित विद्यासागर, साधना साप्ताहिकाचे संपादक  विनोद शिरसाठ, सौ. सिंधू ढोले, डॉ. एस. आय. पाटील, डॉ. राजा दीक्षित, डॉ. वर्षा तोडमल, शब्दाली प्रकाशनाच्या सुनीता त्रिभुवन, सक्षम समीक्षा या त्रैमासिकाचे संपादक डॉ. शैलेश त्रिभुवन आदी उपस्थित होते. 

डॉ. नितीन करमळकर म्हणाले, डॉ. संजय ढोले यांनी मराठीत मोठ्या प्रमाणात विज्ञानसाहित्याची निर्मिती केली आहे. विद्यापीठाच्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत. त्यातून वेळ काढून त्यांनी जे साहित्य निर्माण केले आहे ते फार महत्त्वाचे आहे. विज्ञानातील क्लिष्ट संज्ञा आणि संकल्पना मराठी भाषेत लिहून सर्वसामान्यांपर्यंत विज्ञान पोहचवण्याचे काम डॉ. ढोले करत आहेत.

विनोद शिरसाठ  म्हणाले, डॉ. संजय ढोले यांच्या कथांमधील नायक हे सर्व उच्चशिक्षित, शास्त्रज्ञ आणि संशोधक आहेत. ज्यांनी विज्ञानाचं शिक्षण घेतलेलं नाही मात्र त्यांना विज्ञानाची उत्तम जाण असते असे नायक कथेत येऊ शकतील का ? याचा विचार डॉ. संजय ढोले आणि इतरही क्रियेटिव्ह लेखकांनी करायला हवा.  डॉ. संजय ढोले हे दोन वर्षे जपानमध्ये होते. तेव्हा त्यांना प्लँटोन नावाची कादंबरी सूचली. त्याचबरोबर ते गेली २५ वर्षे विज्ञानासंबंधी लेखन करत आले आहेत. एखाद्या क्षेत्रात दीर्घ काळ सातत्याने लेखन करणे ही फार महत्त्वाची गोष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.

डॉ. पंडित विद्यासागर यांनी जगभरातील विज्ञानसाहित्याचे आणि डॉ. संजय ढोले यांच्या समग्र साहित्याचे विस्तृत विवेचन केले. सामान्य लोकांना आपण सांगितलेले विज्ञान कळाले नाही तर ती आपली चूक आहे, असेही मत त्यांनी मांडले. त्याचबरोबर मराठीत विपुल प्रमाणात विज्ञानसाहित्याची निर्मिती झाल्यानेच त्याची दखल सर्वांना घ्यावी लागली. तसेच नवीन दमाच्या लेखकांनी पुढे यायला हवे, असेही आवाहन त्यांनी केले.