वयाच्या ६६ वर्षी दुसरी पीएचडी मिळवणारे संचालक : डॉ. सुधाकर बोकेफोडे 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव आणि पिंपरी येथील 'एएसएम' इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल स्टडीज संस्थेचे संचालक डॉ. सुधाकर बोकेफोडे यांनी एकदा नाही तर वयाच्या ६६ व्या वर्षी दुस-यांदा पीएचडी पदवी प्राप्त केली आहे.

वयाच्या ६६ व्या वर्षी  पीएचडी पदवी घेणारे संचालक
एएसएमच्या स्टाफने वाढदिवसानिमित्त डॉ सुधाकर बोकेफोडे यांचा सत्कार केला.
1 / 5

वयाच्या ६६ व्या वर्षी पीएचडी पदवी घेणारे संचालक

   आपल्या नावासमोर 'डॉक्टरेट' पदवी असावी ,असे अनेकांना वाटते. त्यासाठी तब्बल पाच वर्षे पीएचडीचा अभ्यास करून मेहनत घ्यावी लागते. परंतु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव आणि पिंपरी येथील 'एएसएम' इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल स्टडीज संस्थेचे संचालक डॉ. सुधाकर बोकेफोडे यांनी एकदा नाही तर वयाच्या ६६ व्या वर्षी दुस-यांदा पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. त्यामुळे पीएचडी पदवी केवळ नावासमोर डॉक्टरेट लावण्यासाठी नाही तर केलेले संशोधन पुढच्या मार्गदर्शक ठरावे यासाठी असते. या उद्देशानेच बोकेफोडे यांनी ' पुणे जिल्ह्यातील दलित चळवळ' या विषयावरील पीएचडीचा प्रबंध सादर केला आहे. विद्यार्थी दशेतच त्यांनी दलित चळवळीतून सामाजिक कामाला सुरुवात केली होती.

    सुधाकर बोकेफोडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नुकतीच पीएचडी पदवी जाहीर झाली आहे. त्यांनी मानव्यविज्ञान विद्याशाखेअंतर्गत पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागात 'पुणे जिल्ह्यातील दलित चळवळ (१९५६ ते २०१०)' या विषयावरील शोध प्रबंध सादर केला. त्यांना डॉ. दीपक गायकवाड यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून तर डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी सहमार्गदर्शक म्हणून संशोधनासाठी मार्गदर्शन केले. बोकेफोडे हे सध्या पिंपरी येथील 'एएसएम' इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल स्टडीज संस्थेचे संचालक आहेत.

       यापूर्वी त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून व्यवस्थापन विद्याशाखेतील पीएचडी पदवी प्राप्त केली होती. 'क्रिटिकल ॲनालिसिस फॉर एचआर पॉलिसीज् बिईंग इम्प्लिमेंटेड इन‌ फार्मासिटिकल इंडस्ट्रीज वीथ रेफरन्स टू एमआयडीसी कुरकुंभ फॉर द पिरेड २००५ ते २०१०' या विषयावर त्यांनी शोध प्रबंध सादर केला. त्यांनी २०१४ मध्ये गाईड शशांक पोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी प्राप्त केली होती.

     एका सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या डॉ. सुधाकर जनार्दन बोकेफोडे यांचा शैक्षणिक व शासकीय सेवेतील प्रशासकीय प्रवास थक्क करणारा आहे.  प्रत्येक व्यक्तीला आयुष्यभर विद्यार्थी असतो, याची काहीशी प्रचिती बोकेफोडे यांच्याकडे पाहून येते. बार्शी तालुक्यातून 1979 मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर मुंबई येथे सिद्धार्थ लॉ कॉलेज मध्ये प्रथम वर्ष एल. एल. बी. अभ्यासक्रम प्रवेश घेतला. मुंबई वडाळा येथे वसतिगृहात प्रवेश मिळाल्याने मुंबईत राहण्यासाठी आधार मिळाला. बार्शी तालुक्यात सामाजिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या बोकेफोडे यांनी पुढे मुंबईत सुध्दा दलित चळवळीतील सक्रिय सहभाग कायम ठेवला. यावेळी त्यांना रामदास आठवले, गंगाधर गाडे, सोलापूरचे शिवशरण ,रतनकुमार, पाटलीपुत्र आदींचा सहवास  लाभला.

   दलित चळवळीत काम करण्याबरोबरच नोकरीचा शोधही त्यांनी कायम ठेवला. मुंबईत युनिट ट्रस्ट ऑफ इंडियामध्ये कामाला सुरुवात केल्यानंतर पुढे विविध ठिकाणी काम करून राज्य शासनात वर्ग एकचे (क्लास वन) अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उपकुलसचिव म्हणून अनेक वर्ष काम पाहिले. खऱ्या अर्थाने विद्यापीठातच त्यांची जडणघडण झाली. विद्यापीठाच्या नियोजन व विकास विभागाचे उपकुलसचिव म्हणून त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. गुणवत्ता सुधार योजनेच्या माध्यमातून विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचा त्यांना भाग होता आले. पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्रासाठी ८३ एकर व नाशिक उपकेंद्रासाठी ६२ एकर जागा मिळण्याच्या प्रक्रियेत बोकेफोडे यांचा प्रशासकीय सहभाग होता.

बोकेफोडे यांनी थायलंड, श्रीलंका व दुबई येथे  शोधनिबंधाचे वाचन केले आहे. थायलंड ,साऊथ कोरियासह विविध देशांमध्ये शैक्षणिक कार्यशाळा व परिषदांना त्यांनी सहभाग घेतला आहे.त्यांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या फोरमचे अध्यक्ष पद भूषवले असून विद्यापीठाचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार आणि बार्शी भूषण पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Next