राज्यात साडे सहा लाख निरक्षरांनी दिली उल्लास- नव भारत साक्षरता चाचणी

15 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील असाक्षर व्यक्तींमध्ये महत्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसीत करावयाची आहेत. या कौशल्यांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण आदी बाबींचा समावेश आहे.

राज्यात साडे सहा लाख निरक्षरांनी दिली उल्लास- नव भारत साक्षरता चाचणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्र सरकार मार्फत  राज्यात राबवत असलेल्या उल्लास- नव भारत (Ulas Nav Bharat Program) साक्षरता कार्यक्रमाची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (Basic Literacy and Numeracy Assessment Test) नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या परीक्षेसाठी 8 लाख 4 हजार इतक्या असाक्षरांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे 6 लक्ष 50 हजार इतक्या असाक्षरांनी परीक्षा दिली. राज्यात एकूण 53 हजार 271 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. यावेळी शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर (Pankaj Bhoyar) तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी नियुक्त केलेले 'जिल्हा परीक्षा निरीक्षक (District Examination Inspector) यांनी विविध परीक्षा केंद्रावर भेटी देवून असाक्षरांना परीक्षा देण्याचा उत्साह वाढविला. 15 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील असाक्षर व्यक्तींमध्ये महत्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसीत करावयाची आहेत. या कौशल्यांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण आदी बाबींचा समावेश आहे.

 उल्लास- नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सन 2024- 25 मध्ये उल्लास अॅपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांची रविवार 23 मार्च 2025 रोजी चाचणी घेण्यात आली. यु-डायस क्रमांकानुसार असाक्षरांची नोंदणी केलेली प्रत्येक शाळा ही परीक्षा केंद्र होती. परीक्षा केंद्रावर सकाळी 10.00 ते सायंकाळी 05.00 या वेळेत ऑफलाईन पद्धतीने व असाक्षरांच्या सोयीनुसार ही चाचणी घेण्यात आली . ही चाचणी एकूण 150 गुणांची होती. भाग क यामध्ये (वाचन) 50 गुण, भाग ख (लेखन) 50 गुण, भाग ग (संख्याज्ञान) 50 गुण अशा 150 गुणांचे विभाजन करण्यात आले आहे. चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी 33% (16.5 गुण) अनिवार्य आहेत व एकूण 150 गुणांपैकी 33 टक्के (49.5 गुण) अनिवार्य असतील. कोणत्याही एका भागाचे 33% गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त 5 वाढीव गुण देता येतील, परंतू तीनही भागाचे मिळून 5 पेक्षा जास्त ग्रेस गुण देता येणार नाहीत. प्रत्यक्ष पेपरचा कालावधी सकाळी 10.00 ते सायंकाळी 05.00 या वेळेत 3 तासांचा वेळ देण्यात आला . तर दिव्यांग व्यक्तींसाठी 30 मिनिट जास्तीचा वेळ दिला गेला. 

मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, कन्नड, तेलगू, तामीळ, बंगाली अशा एकूण ९ माध्यमांतून ही चाचणी घेण्यात आली. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) विहित निकषानुसार उत्तीर्ण झाल्यानंतर नवसाक्षरांना केंद्रशासनाकडून प्रमाणपत्र /गुणपत्रक देण्यात येणार आहे. या चाचणीच्या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरुकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण ही जीवनकौशल्ये विकसित होतील. तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचे, मत शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी यावेळी व्यक्त केले.