आजी आजोबांचीही होणार परीक्षा ; उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत १७ मार्चला चाचणी

देशातील १५ वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन,लेखन) व संख्याज्ञान विकसीत करून देशातील असाक्षर व्यक्तींना महत्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसीत करण्याची या पद्धीतीच्या परीक्षा वापर केला जात आहे.

आजी आजोबांचीही होणार परीक्षा ; उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत १७ मार्चला चाचणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रशासन पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमात (Ullas-Nav Bharat Literacy Programme) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (Numeracy Assessment Test) येत्या रविवारी १७ मार्च रोजी महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात होणार आहे. राज्यात आतापर्यंत ६ लाख लक्ष २० हजार इतक्या असाक्षरांची ऑनलाइन नोंदणी (Online Registration of Illiterates) केंद्रशासनाकडे झाली असून त्या सर्वांची १७ मार्च २०२४ रोजी परीक्षा घेण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. त्यामुळे नातवंडांसह आता आजी - आजोबाही परीक्षा देणार असल्याने अभ्यासात मग्न आहेत.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम राबविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला. राज्यात आतापर्यंत ६ लाख लक्ष २० हजार इतक्या असाक्षरांची ऑनलाइन नोंदणी केली आहे. यामध्ये सर्वाधिक जळगाव जिल्ह्यातून ६७ हजार ५७५ तर सर्वात कमी सिंधूदूर्ग जिल्ह्यातून  २६१ असाक्षरांनी नोंदणी केली आहे.

योजना विभागाचे संचालक डॉ. महेश पालकर म्हणाले, देशातील १५ वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन,लेखन) व संख्याज्ञान विकसीत करून देशातील असाक्षर व्यक्तींना महत्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसीत करण्याची या पद्धीतीच्या परीक्षा वापर केला जात आहे. या कौशल्यांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण इ. बाबींचा समावेश आहे. स्थानिक रोजगार, पुनर्कुशलता आणि उच्च कौशल्य प्राप्त करण्याच्या दृष्टीकोनातून प्रौढ नवसाक्षरांसाठी निरंतर शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून देशातील १५ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये विकसीत करण्याचा हा प्रयत्न आहे. 

या कार्यक्रमात उल्लास ॲपवर असाक्षरांच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या कार्यक्रमा अंतर्गत ज्या शाळेतून उल्लास ॲपवर असाक्षर व्यक्तींची नोंदणी केलेली आहे, ती प्रत्येक शाळा परीक्षा केंद्र असणार आहे.  नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवार १७ मार्च २०२४ रोजी ऑफलाईन पद्धतीने केंद्रशासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेस जाताना असाक्षर व्यक्तीने स्वतःचा एक आयकार्ड साईज फोटो नोंदणी फॉर्मवर लावण्यासाठी आणावा. तसेच जन्मतारखेचा पुरावा म्हणून असाक्षर व्यक्तीने स्वतःचे मतदान ओळखपत्र/ आधारकार्ड/पॅनकार्ड/ बँक पासबुक इत्यादीपैकी कोणतेही एक ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. परीक्षेची वेळ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत असेल. प्रत्यक्ष पेपरचा कालावधी ३ तासांचा असेल. उत्तरपत्रिकेतील माहिती व उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन वापरावा.

 योजना विभागाचे शिक्षण उपसंचालक राजेंद्र क्षीरासार म्हणाले, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीची प्रश्नपत्रिका ही पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित तीन भागांमध्ये विभागलेली असून एकूण १५० गुणांची आहे. अनुक्रमे (वाचन) ५० गुण, (लेखन) ५० गुण, (संख्याज्ञान) ५० गुण असे आहेत. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के (१७ गुण)अनिवार्य आहेत व एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के (५१ गुण) अनिवार्य असतील. ही परीक्षा विहित निकषानुसार उत्तीर्ण झाल्यानंतर नवसाक्षरांना केंद्रशासनाकडून प्रमाणपत्र/ गुणपत्रक देण्यात येणार आहे.