लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर भरदिवसा प्राणघातक हल्ला

शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते तसेच लेखक म्हणून हेरंब कुलकर्णी यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. विविध मुद्द्यांवर लेखन करत ते शासनाच्या चुकीच्या धोरणांवर आवाज उठवत असतात.

लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर भरदिवसा प्राणघातक हल्ला
Heramb Kulkarni

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व लेखक हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्यावर दोन दिवसांपूर्वी भरदुपारी प्राणघातक हल्ला झाल्याचे समोर आले आहे. दुचाकीवरून घरी जात असताना त्यांना तिघांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण केली आहे. याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना अहमदनगर (Ahmednagar) शहरातील रासणेनगर परिसरात घडली आहे.

 

शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते तसेच लेखक म्हणून हेरंब कुलकर्णी यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. विविध मुद्द्यांवर लेखन करत ते शासनाच्या चुकीच्या धोरणांवर आवाज उठवत असतात. ते अहमदनगर शहरात श्रमिकनगरमध्ये राहतात. ते नगरमधील सिताराम सारडा विद्यालयात मुख्याध्यापक आहेत.

‘महानिर्मिती’चा फुटलेला पेपरच केला जगजाहीर; आता SIT चौकशी होणार का?

 

कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचे सहकारी रामकृष्ण सुधाकर कुलकर्णी यांच्यासोबत दुचाकीवरून घरी निघाले होते. रासणेनगर जवळील जोशी क्लाससमोर आल्यानंतर एक दुचाकी आडवी आली. त्यावरील तिघांनी खाली उतरून थेट लोकंडी रॉडने डोक्यात, दोन्ही पायाला व पाठीत मारहाण केली. डोक्याला ४ टाके पडले आहेत. डोक्यावर चा दुसरा फटका सहकाऱ्याने हाताने अडवला त्यामुळे ते बचावले.अन्यथा डोक्यावर जबर मार बसला असता.

 

हेरंब कुलकर्णी यांच्या सहकाऱ्याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिघेही अनोखळी व्यक्ती तिथून पळून गेले. या घटनेनंतर हेरंब कुलकर्णी व सहकाऱ्याने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केली आहे. ४८ तासात पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही की अजूनही CCTV फॉलोअप घेतला नाही. त्यामुळे आज ही घटना समाजाच्या समोर मी मांडत आहे. सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात अडवून रॉड ने जीवघेणा हल्ला करणे हे खूप उद्विग्न करणारे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k