MPSC Online Exam : व्यापम घोटाळा महाराष्ट्रात होवू देऊ नका!

डोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र लिहित ही मागणी केली आहे.

MPSC Online Exam : व्यापम घोटाळा महाराष्ट्रात होवू देऊ नका!
MPSC Online Examination

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) ३० एप्रिल रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र एका टेलिग्राम (Telegram) चॅनेलवर व्हायरल झाल्यानंतर आता अनेकांनी ऑनलाईन परीक्षेकडे (Online Examination) बोट दाखविण्यास सुरुवात केली आहे. आपल्याकडे प्रश्नपत्रिका असल्याचा दावाही हॅकरने केला होता. त्यामुळे आता ऑनलाईन परीक्षा न घेता ऑफलाईन परीक्षेची मागणी होत आहे. मध्यप्रदेशचा व्यापम घोटाळा (Vyapam) महाराष्ट्रात होवू देऊ नका, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे (Congress) सहकार विभागाचे सरचिटणीस बळीराम डोळे (Baliram Doley) यांनी केली आहे.

डोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र लिहित ही मागणी केली आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, एमपीएससी साठी हे प्रकरण, हा हलगर्जीपणा नवीन नाही २०१३ व २०११ मध्ये देखील असे गंभीर प्रकरण झालेले आहेत. आज चार दिवस झाले तरी सरकारकडून यासंदर्भात साथी याची दखल देखील घेतली जात नाहीये कारवाई तर दूरच. यावर्षीपासून राज्यसेवा मुख्य परीक्षा व संयुक्त गट ब व क मुख्य परीक्षा ऑनलाईन घेण्याचा घाट घातला आहे. आंदोलने करून राज्यसेवा परीक्षा पॅटर्न २०२५ पर्यंत कायम ठेवल्यानंतर रात्रीतून राज्यसेवा मुख्य परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय पूर्णतः संशयास्पद आहे. तीन दिवस चालणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आयोगाचे नेमके काय गौडबंगाल आहे, असा सवाल डोळे यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : स्वाधारचा चमत्कार : 24 तासात पाच कोटी मंजूर; प्रकाश आंबेडकरांचा पाठपुरावा

सकाळी एक पेपर ऑफलाईन देऊन त्याच दिवशी दुपारी ऑनलाईन परीक्षा घेणे हा निर्णय हास्यास्पद आहे. गरज नसताना कुणाची मागणी नसताना हा निर्णय कुणाच्या हितासाठी घेतला आहे? २०१३ मध्ये फक्त अभ्यास झाला नाही म्हणून आयोगाची वेबसाईट हॅक करणारे उमेदवार २०२३ मध्ये ७०० मार्क्स मिळवण्यासाठी काय-काय नाही करणार? महाराष्ट्रात झालेली एकही ऑनलाईन परीक्षा बिना घोटाळ्याची पार पडलेली नाही.

त्यामुळे राज्यसेवा मुख्य व संयुक्त मुख्य या दोन्ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाइनच घेतल्या जाव्यात. ३० एप्रिलला होणाऱ्या होणाऱ्या परीक्षाद्वारे पहिल्यांदाच आठ हजार पेक्षा जास्त पदे भरली जात आहेत. ऑनलाईन परीक्षा घेऊन त्यांच्यावर अन्याय करू नका. मध्यप्रदेशचा व्यापम घोटाळा महाराष्ट्रात होवू देऊ नका व नुकतेच राजस्थान सरकारने RPSC सदस्यावर कारवाई केली याची देखील माहिती घ्यावी, अशी मागणी डोळे यांनी केली आहे.

हेही वाचा : वा ! याला म्हणतात मैत्री , तीन जीवलग मैत्रीणी एकाच वेळी झाल्या पोलीस

आयोगाची online यंत्रणा किती तकलादू आहे हे हॅकरने पुराव्यानिशी दाखवून दिले आहे. या प्रकराचा तक्रार केल्यानंतर आयोगाने एक तासाच्या आत एक नोटिफिकेशन काढून स्वतःला "क्लिन चिट" देऊन टाकली आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, हा फक्त त्या हॉलतिकिट पुरता मर्यादित विषय नव्हे. आयोगाच्या वेबसाईटवर जितक्या उमेदवारांची प्रोफाईल आहेत, त्या सर्वांच्या भवितव्याच्या प्रश्न आहे. या प्रकरणाची सरकारने तातडीने दखल घ्यावी व यासंबंधी निवृत्त न्यायाधीशामार्फत सखोल चौकशी करावी. यासाठी त्रिसदस्यीय समितीत निवृत्त न्यायाधीश, सरकारी सदस्य, विरोधीपक्षातील सदस्य यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी डोळे यांनी केली आहे.