परीक्षेतील गैरप्रकारांमुळे UP पोलीस भरती परीक्षा रद्द, 48 लाख उमेदवारांचे स्वप्न भंगले ; योगी सरकारचा निर्णय

पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला.

परीक्षेतील गैरप्रकारांमुळे UP पोलीस भरती परीक्षा रद्द, 48 लाख उमेदवारांचे स्वप्न भंगले ; योगी सरकारचा निर्णय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पेपरफुटीची तक्रार, पेपर छपाईतील अनियमितता, प्रश्नपत्रिका उशिरा येणे, सनी लिओनीचे प्रवेशपत्र, कॉपी प्रकरण यामुळे उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Police Recruitment) पोलीस काॅस्टेबल पदाची भरती (Police Constable Recruitment) देशाभरात चांगलीच गाजली होती. भाजप शासित राज्यात असे प्रकार घडल्यामुळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले. लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा असलेल्या राज्यात असा प्रकार निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकारला परवडणारा नव्हता. त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा अखेर रद्द (Police Constable Recruitment Cancelled) करण्याचा निर्णय  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी घेतला. विशेष म्हणजे 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या या परीक्षेत सुमारे 48 लाख उमेदवारांनी भाग घेतला होता. त्यामुळे या सर्व उमेदवारांचे पोलीस होण्याचे स्वप्न भंगले आहे. 

तब्बल 60 हजारांहून अधिक पदांच्या भरतीसाठी घेण्यात येणारी लेखी भरती परीक्षा रद्द करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. यासोबतच येत्या 6 महिन्यांत पुन्हा ही परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. उमेदवार बऱ्याच दिवसांपासून फेरपरीक्षेची मागणी करत होते. परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप उमेदवारांनी केला होता. एका अर्थाने हा निर्णय योग्य जरी असला तरी पोलीस होण्याचे स्वप्न पाहाणाऱ्या तरूणांसाठी आणखीन सहा महिने परीक्षेची वाट पाहावी लागणार आहे. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनंतर एक तपास समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व  तक्रारींची चौकशी करणार आहे. तपास अहवालात समोर आलेल्या माहितीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. यानंतर आता पोलीस भरती मंडळाने उमेदवारांकडून पुराव्यासह हरकती-सूचना मागवल्या आहेत. तपासात हे आक्षेप खरे आढळून आल्यास त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल.