नॅक मूल्यांकनाचा 'पाटील पॅटर्न '

नॅक मूल्यांकनाचा 'पाटील पॅटर्न 'देशभर राबवायला हवा, अशी अपेक्षा राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांनी 'एज्युवार्ता'शी बोलताना व्यक्त केली.

नॅक मूल्यांकनाचा 'पाटील पॅटर्न '

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅक मूल्यांकनाच्या (NAAC assessment)प्रक्रियेत बदल करण्यात आला असून या बाबतची घोषणा नुकतीच झाली.मात्र,केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान(Union Education Minister Dharmendra Pradhan)यांना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांनी नॅक मूल्यांकनाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबतचे पत्र दिले होते.त्यात ग्रेड सिस्टिम एवजी मूल्यांकन केले किंवा नाही,अशी सोपी पध्दती आणावी,अशी भूमिका मांडली होती. या भूमिकेचा नॅकने सकारात्मक विचार केला. त्यामुळे ग्रेड सिस्टिम (grade system)बंद करून केवळ मूल्यांकन झाले अथवा नाही (बायनरी) एवढाच भाग ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महाराष्ट्र हे नॅक मूल्यांकनात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी वैयक्तिक लक्ष दिले. त्यामुळे नॅक मूल्यांकनाचा 'पाटील पॅटर्न ' (Patil pattern)देशभर राबवायला हवा, अशी अपेक्षा राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर (Director of Higher Education Dr. Shailendra Devlankar) यांनी 'एज्युवार्ता'शी बोलताना व्यक्त केली.
   
स्वत: नॅक कडून सांगितले जाते की नॅक हे बंधनकारक नाही.मात्र, शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवून नॅक सर्व शैक्षणिक संस्थांना बंधनकारक केले, असे नमूद करून देवळाणकर म्हणाले, नॅकने विद्यापीठ आणि महाविद्यालय असे दोन भाग केले.मात्र, त्यात ग्रामीण आणि शहरी असे भाग केले नाहीत. परंतु, ग्रामीण व शहरी भागाच्या गरजा या वेगवेगळ्या असतात. पुण्यातील आणि गडचिरोलीतील महाविद्यालयांच्या गरजा एकसारख्या असणार नाहीत. त्यातही नॅकचे शुक्ल आणि एकूण खर्च सर्व साधारणपणे दहा लाखांपर्यंत जातो. त्यामुळे नॅकचे शुल्क कमी करावे,अशी मागणी करण्यात आली. तसेच नॅक मूल्यांकनात एखाद्या महाविद्यालयाला ए आणि शेजारील महाविद्यालयाला बी ग्रेड मिळाला तर त्यातून अडचणी निर्माण होत होत्या.त्यामुळे ग्रेडेशनची पद्धती नसावी,असेही पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केले होते.

नॅक मूल्यांकनाचा पाटील पॅटर्न का म्हणता येईल, याबबात बोलताना डॉ. देवळाणकर म्हणाले,मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार नॅक मूल्यांकनासाठी एआयक्यूए दाखल करण्याचे पत्र 2 मार्च  2023 ला काढले. तसेच विद्यापीठांना पत्र लिहिले की ज्या महाविद्यालयांनी नॅक केले नाही, त्यांची संलग्नता काढून घ्यावी,हे पत्र 23 मे  2023 ला काढले.त्या पत्रात 2016 कायद्याचा उल्लेख केला. तसेच केवळ कॅम्पलसी केले नाही तर त्यानंतर 19 एप्रिल 2024 ला  परिस स्पर्श ही योजना काढली. त्यानुसार 150 महाविद्यालयांना मार्गदर्शक महाविद्यालये म्हणून मान्यता दिली.त्यातून नॅक मूल्यांकनाला प्रोत्साहन मिळाले.तसेच नॅक सक्तीचे करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य होते.

नॅकच्या स्थापनेला 30 वर्षे पूर्ण झाली असून या 30 वर्षात नॅकने 9 हजार 852 महाविद्यालयांचे मूल्यांकन केले. त्यात एकट्या महाराष्ट्रातील महाविद्यालयांची संख्या 1 हजार 984 एवढी आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक असून त्यांच्या महाविद्यालयांची संख्या 1046 एवढी आहे. तामिळनाडू 986 महाविद्यालयासह तिसऱ्या क्रमांकावर आहे.त्यातही महाराष्ट्रात ए ग्रेड मिळवणाऱ्या महाविद्यालयांची संख्या 224 आहे. 2022 मध्ये 175 महाविद्यालयांना ए ग्रेड होता. मात्र 2023 मध्ये ही संख्या 224 वर गेली. यांचे श्रेय महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या पाटील पॅटर्नला जाते. त्यामुळे देशभर त्याचा अवलंब व्हायला हवा,असेही देवळाणकर म्हणाले.

------------------------

राजकीय इच्छाशक्ती असल्यास काय बदल होतो.यांचे पाटील पॅटर्न  हे उत्तम उदाहरण आहे.तसेच महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रगतीची माहिती देण्यासाठी देशातील सर्व शिक्षण मंत्र्यांना मुंबईमध्ये बोलावले जाणार आहे. महाराष्ट्रातील नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राबवल्या केलेल्या उपाय योजनांची माहिती सुध्दा त्यांना दिली जाणार आहे.
- डॉ.शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य
---------------------