Talathi Bharti : गैरप्रकारांनी गाजलेली परीक्षा संपली, पावणे दोन लाख उमेदवारांनी फिरवली पाठ

तलाठी भरतीसाठी तब्बल १० लाख ४१ हजार ७१३ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सर्वाधिक १ लाख १४ हजार उमेदवार एकट्या पुणे जिल्ह्यातील होते.

Talathi Bharti : गैरप्रकारांनी गाजलेली परीक्षा संपली, पावणे दोन लाख उमेदवारांनी फिरवली पाठ
Talathi Bharti

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत (Maharashtra Revenue Department) तलाठी (गट क) संवर्गातील एकूण ४ हजार ६४४ पदांच्या सरळसेवा भरतीसाठी (Talathi Recruitment) दि. १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली आहे. या परीक्षेदरम्यान गैरप्रकाराच्या अनेक घटना समोर आल्या असून पोलिसांनी (Maharashtra Police) काही जणांना अटकही केली आहे. गैरप्रकारांनी गाजलेल्या या परीक्षेकडे सुमारे पावणे दोन लाख उमेदवारांनी पाठ फिरवल्याचे समोर आले आहे.

 

तलाठी भरतीसाठी तब्बल १० लाख ४१ हजार ७१३ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सर्वाधिक १ लाख १४ हजार उमेदवार एकट्या पुणे जिल्ह्यातील होते. ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेण्यात आली. पहिला टप्पा १७ ते २२ ऑगस्ट, दुसरा टप्पा २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर आणि तिसरा टप्पा ४ ते १४ सप्टेंबर या कालावधीत पार पडला. एकूण १९ दिवसांत ५७ शिफ्टमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. टीसीएस कंपनीवर या परीक्षेची संपूर्ण जबाबदारी होती.

विद्यार्थ्यांनो, लागा तयारीला! विद्यापीठाच्या ‘युवक महोत्सवा’चे पडघम

 

परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून गैरप्रकारांच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून सुरू झाल्या. त्यातच वैद्यकीय विभागासह पोलीस भरती व म्हाडा भरतीमध्ये पोलिसांना हवा असलेला आरोपी गणेश गुसिंगे या पोलिसांनी अटक केल्यानंतर तलाठी भरतीत टोळी सक्रीय असल्याचा भांडाफोड झाला. त्यानंतर सातत्याने हायटेक गैरप्रकारांबाबत पोलिसांकडून उलगडा सुरूच राहिला.

 

काही परीक्षा केंद्रांमधील कर्मचारी, क्लास चालकांकडूनही गैरप्रकार केले जात असल्याचे तपासात समोर आले. औरंगाबाद येथील एका केंद्रातील कर्मचारी आणि पर्यवेक्षक कागदावर उमेदवारांना उत्तरे पुरवित असल्याचे आढळून आले. त्यामुळे उमेदवारांसह विविध संघटनांकडून ही प्रक्रिया स्थगित करून केवळ टीसीएसच्या सेंटरवरच परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली.

 

राज्य सरकारसह महसूल विभागानेही ही परीक्षा पारदर्शकपणे सुरू असल्याचे स्पष्टीकरण दिले. पण परीक्षा संपली असली तरी ही परीक्षा प्रक्रिया स्थगित करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून करण्यात आली आहे. दरम्यान, भरतीसाठी अर्ज केलेल्या तब्बल १ लाख ७६ हजार ७५३ उमेदवारांनी परीक्षेकडे पाठ फिरवली आहे. हे उमेदवार परीक्षेला गैरहजर राहिल्याचे राज्य परीक्षा समन्वयक व अपर जमाबंदी आयुक्त आनंद रायते यांनी दिली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j