अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘आयआयटी’मध्ये शिकण्याची संधी

आयआयटी, मुंबई येथील संशोधन व विकास (Research & Development) सुविधांचा वापर करण्याच्या उद्देश्याने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘आयआयटी’मध्ये शिकण्याची संधी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील शासकीय व अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयातील (Engineering College) पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (IIT Bombay) शिकण्याची संधी मिळणार आहे. यासाठी तंत्र शिक्षण संचालनालय (Technical Education) आणि आयआयटी, मुंबई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

आयआयटी, मुंबई येथील संशोधन व विकास (Research & Development) सुविधांचा वापर करण्याच्या उद्देश्याने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. तंत्रशिक्षण संस्थांमधील अध्यापन, अध्ययन व संशोधन विकास व विस्तार या बाबींसाठी जागतिक दर्जाच्या आयआयटी या संस्थेचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच संस्थामधील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास मदत होणार आहे.

#फडणवीस_राजीनामा_द्या : पेपरफुटीवरील कायद्यासाठी विद्यार्थी संघटना आक्रमक

सामंजस्य करारावर तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी व आयआयटी मुंबई तर्फे   डॉ. मिलिंद अत्रे (अधिष्ठाता-संशोधन आणि विकास)  यांनी स्वाक्षरी केली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, डॉ. सचिन पटवर्धन, डॉ. अनिल नांदगांवकर व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 सामंजस्य करारातील ठळक बाबी –

विद्यार्थ्यांसाठी

  • तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील 15 शासकीय व अनुदानित संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करुन देणे.
  • आयआयटी मुंबई येथील पायाभूत सुविधा (Lab / Library)इ. चा वापर,उद्योजकता विकासासाठी मार्गदर्शन करणे.
  • तज्ज्ञ अध्यापकांद्वारे व्याख्याने आयोजित करणे,संशोधन व विकास (Research & Development) सुविधांचा वापर करणे अशा विद्यार्थी केंद्रित बाबींचा या सामंजस्य करारात अंतर्भाव आहे.

 

अध्यापकांसाठी :

आयआयटी मुंबई यांच्या विद्यमान धोरणांनुसार शासकीय व अनुदानित अभियांत्रिकी संस्थांमधील शिक्षकवर्गासाठी व्यावसायिक प्रशिक्षण/कार्यक्रम, कार्यशाळा, आयआयटी येथील प्रगत प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे, यांचा वापर करणे.

 

 संशोधन व विकास कामांमध्ये मदत

राज्य शासन आणि  केंद्र शासन यांच्या विविध योजनेंतर्गत निधी सहाय्यासाठी संशोधन आणि विकास प्रस्ताव तयार करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रस्तावाची आयआयटी येथील तज्ञांद्वारे  छाननी करणे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD