धक्कादायक: जळगावच्या ४ विद्यार्थ्यांचा रशियात बुडून मृत्यू 

अचानक मोठी लाट आली आणि त्यांना नदीत ओढले गेले. त्यात चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या चौघांसोबत असलेल्या एका विद्यार्थ्यीनीस वाचवण्यात यश आले आहे.  

धक्कादायक: जळगावच्या  ४ विद्यार्थ्यांचा रशियात  बुडून मृत्यू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील रशिया (Russia) मध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या चार विद्यार्थ्यांचा यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीत  वोल्खोव्ह नदीच्या (Volkhov River) किनारी फेरफटका मारत होते. यावेळी अचानक मोठी लाट आली आणि ते नदीत ओढले गेले. त्यात चौघांचा बुडून मृत्यू (Four drowned) झाल्याची दुर्दैवी घटना घडली . या चौघांसोबत असलेल्या एका विद्यार्थ्यीनीस वाचवण्यात यश आले आहे. 

जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, रशियातील सेंट पीटर्सबर्गजवळील नदीत पाच विद्यार्थ्यी बुडाले होते. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली . तर एका विद्यार्थीनीचा जीव वाचवण्यात रशियन अधिकाऱ्यांना यश आले आहे. दोन मृतदेह सापडले असून दोन मृतदेहांसाठी शोध मोहीम सुरू आहे. कुटुंब आणि आम्ही पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहोत. ज्या विद्यार्थ्यीनीचा जीव वाचला आहे तिला सर्वोत्तम वैद्यकीय सेवा दिली जात आहे. या सर्वांचे मृतदेह लवकरच भारतात पाठवले जातील. 

याबाबत प्राथमिक माहितीनुसार, हर्षल अनंतराव देसले (भडगाव), जिशान अश्पाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी (अमळनेर) मलिक गुलामगौस मोहम्मद याकूब या चौघांचा मृत्यू झाला असून निशा भूपेश सोनवणे या विद्यार्थिनीला वाचवण्यात आले आहे. हे सर्व विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातील असून १८ ते २० वयोगटातील आहेत. 

रशियन मीडिया रिपोर्ट्स कडून सांगण्यात आले आहे की, नदीजवळील तीरातून बाहेर पडलेली एक महिला विद्यार्थिनी अडचणीत आली आणि तिच्या चार साथीदारांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात आणखी तिघेही नदीत बुडाले. स्थानिक आपत्कालीन सेवांनी वोल्खोव्ह नदीतून आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढले आहेत, तर उर्वरित दोन बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध सुरू आहे.  

सध्या रशियन फेडरेशनमधील संबंधित एजन्सी पुढील कार्यवाही करत आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने विदेश मंत्रालयाशी संपर्क करून रशियातील भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क केला. भारतीय दुतावासाने संबंधित विद्यापीठाशी संपर्क करून माहिती जाणून घेतल्याचे सांगितले असून पुढील कार्यवाही सुरु आहे. पालकांना पूर्ण सहकार्य करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाने भारतीय दुतावासच्या अधिकाऱ्यांना केली आहे.