मुलांना घडवण्यासाठी शाळेत शिस्त, शैक्षणिक वातावरण आणि भौतिक सुविधा अत्यावश्यक; पोलीस आयुक्तांचे मत

शाळेतील बरेच पालक पोलीस दलातले आहेत, त्यामुळे त्यांची मनमानी शाळेत चालू देणार नाही; पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार

मुलांना घडवण्यासाठी शाळेत शिस्त, शैक्षणिक वातावरण आणि भौतिक सुविधा अत्यावश्यक; पोलीस आयुक्तांचे मत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 प्रियदर्शनी पुणे पोलीस पब्लिक स्कुल (Priyadarshini Pune Police Public School) ही शहरातील अशा काही निवडक शाळांमधून एक आहे जिथे पोलीस पालक आपल्या पाल्याना आत्मविश्वासाने पाठवू शकतात,असे गौरोउद्गार पुण्याचे पोलीस आयुक्त (Pune Police Commissioner) अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी व्यक्त केले. तसेच चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी शाळांमध्ये चांगल्या  शैक्षणिक वातावरणासह आवश्यक भौतिक सुविधा आणि शिस्तही अत्यावश्यक गोष्टी आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

प्रियदर्शनी पुणे पोलीस पब्लिक स्कुलमध्ये उभारण्यात आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स,  रोबोटिक्स अँड कोडींग लॅबच्या उदघाट्न (Inauguration of Artificial Robotics Lab) प्रसंगी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त अरविंद चावरिया,  प्रियदर्शनी शाळेचे संचालक व विश्वस्त डॉ. राजेंद्र सिंग, जितेंद्र सिंग, नरेंद्र सिंग आदी उपस्थित होते.तसेच शाळेच्या प्राचार्या अर्पिता दिक्षित, गायत्री जाधव आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. 

या शाळेचा आणखीन विकास व्हावा यासाठी शाळा प्रशासन स्थानिक पोलीस प्रशासन दोघांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे.शाळेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्स अँड कोडींग लॅब सारख्या सुविधा निर्माण केल्याबद्दल आणि शाळेचे विश्वस्त राजेंद्र सिंग यांनी यांचे अभिनंदनच करायला हवे,असेही अमितेश कुमार म्हणाले. 

अमितेश कुमार म्हणाले की, "मुलांना तंत्रज्ञावर आधारित अत्याधुनिक कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी शाळेत स्मार्ट बोर्ड असणे आवश्यक आहेत. त्या दृष्टीने शाळेने प्रस्ताव पाठवावा  शाळेला स्मार्ट बोर्ड उपलब्ध  करून दिले जातील. तसेच पालक आणि शिक्षक यांच्या सक्रिय सहभागाचा उत्तम नमुना असणारी संघटना शाळेने निर्माण करावी, जेणेकरून शाळेच्या विकासात हातभार लागेल.शाळेतील बरेच पालक पोलीस दलातले आहेत, त्यामुळे त्यांची मनमानी शाळेत चालू देणार नाही. मुलांना शाळेत शिकायचे असेल तर त्यांना शाळेचे शुल्क द्यावेच लागेल. याबाबतीत कोणतीही तडजोड चालणार नाही, असा स्पष्ट  इशारही अमितेश कुमार यांनी यावेळी दिला. 

जितेंद्र सिंग म्हणाले, प्रियदर्शनी शाळा नेहमीच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने दहा वर्षे पुढचा विचार करते. त्यामुळे या शाळेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स,रोबोटिक्स अँड कोडींग लॅब उभी केली आहे.विद्यार्थ्यांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स,रोबोटिक्सवरील अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी निगडीत अभ्यासक्रम तयार केले असून त्याचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल.