विद्यापीठाच्या विभाग प्रमुखासह विद्यार्थ्यांना अटक ; देवी, देवतांवरील आक्षेपार्ह नाटक भोवले

विद्यापीठाच्या विभाग प्रमुखाला अशा पद्धतीने अटक केल्याची ही पहिलीच घटना आहे.

विद्यापीठाच्या विभाग प्रमुखासह विद्यार्थ्यांना अटक ; देवी, देवतांवरील आक्षेपार्ह नाटक भोवले

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) ललित कला केंद्रात (Fine Arts Center)सादर करण्यात आलेल्या नाटकात देवी, देवतांचे पात्र साकारणाऱ्या कलाकारांनी आक्षेपार्ह विधाने केली. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) कार्यकर्त्यांनी याबाबत आक्षेप घेऊन नाटक बंद पडले. तसेच याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी ललित कला केंद्र विभागाचे प्रमुख व सहा विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक (Department head of Fine Arts Center and six students arrested) केली आहे. विद्यापीठाच्या विभाग प्रमुखाला अशा पद्धतीने अटक केल्याची ही पहिलीच घटना आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र विभागात नाटक पाहण्यासाठी गेलेल्या हर्षवर्धन हरपुडे या विद्यार्थ्याने पोलिसांकडे याबाबत फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणी ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख डॉ.प्रवीण भोळे, भावेश पाटील, जय पेडणेकर, प्रथमेश सावंत, ऋषिकेश दळवी, यश चिखले व इतर अनोळखी विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच सर्व आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा : शिक्षण विद्यापीठातील नाटक ABVP संघटनेने पाडले बंद; देवी ,देवतांचे पात्र साकारणाऱ्या कलाकारांच्या तोंडी आक्षेपार्ह विधाने

 हर्षवर्धन हरपुडे यांने पोलिसांकडे फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, मी माझ्या मित्रांसह ललित कला केंद्रात नाटक पाहण्यासाठी गेलो होतो. या ठिकाणी चार नाटकांचे प्रयोग आयोजित केले होते.  पहिली दोन नाटके झाल्यानंतर तिसरे नाटक हे श्री राम व सीता माता यांच्यावर आधारित होते.सदर नाटकाचे प्रदर्शन होत असताना सीता मातेचा अभिनय करणारा मुलगा हा स्टेजवर सिगारेट ओढत होता. अर्वाचे भाषेत शिव्या देत होता. त्याच बरोबर श्री रामाचा शोध घेत असताना सदरचे पात्र हे श्रीरामाची तुलना राखी सावंत हिचेशी करत होता. तसेच सदर नाटकात श्री लक्ष्मणाचे पात्र हे रावणाची मालिश करीत असल्याचे दाखवण्यात आले. रावणास पाहून श्री राम पळून गेले व राम भागा-भागा असा एकेरी भाषेत श्री रामाचा उल्लेख केला गेला. सदर नाटक प्रस्तुती दरम्यान नाटकाचा स्क्रिप्ट रायटर, दिग्दर्शक व सदर नाटकातील पात्र सीता, लक्ष्मण, रावणाचे पात्र करणारे विद्यार्थी यांनी  हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या आहेत. सदरील नाटकाचा भाग मी व माझ्या मित्राने मोबाईल मध्ये शूट केला आहे. सदरील नाटकामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. नाटकातील कलाकार व इतर मुलांनी आम्हाला धक्काबुक्की करून आम्हाला मारहाण केली.