संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या मुलाखती 11 जानेवारीला 

डॉ.संदेश जाडकर, डॉ.संजय ढोले, डॉ.राजू गच्छे ,डॉ.विजय फुलारी यांच्या नावाचा समावेश आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या मुलाखती 11 जानेवारीला 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू (Sant Gadgebaba Amravati University Vice-Chancellor)पदाची निवड प्रकिया सुरू झाली असून येत्या 11 जानेवारी रोजी पात्र उमेदवारांच्या मुलाखती (Interviews of eligible candidates)घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या अमरावती विद्यापीठाला अखेर पूर्णवेळ कुलगुरू मिळणार आहेत.त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University)नेहमीच कुलगुरू पदाच्या शर्यतीत असणारे तीन उमेदवार असून कोल्हापूरच्या एका उमेदवाराचा समावेश आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनानंतर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आबेडकर मराठवाडा कुलगुरू कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे देण्यात आली आहे.मात्र,  दोन्ही विद्यापीठांचा कामाचा व्याप मोठा असल्याने अमरावती विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू असणे गरजेचे आहे. परंतु, नवीन वर्षात विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळणार आहेत.

हेही वाचा : CUET PG : कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट प्रक्रियेला सुरूवात

गेल्या वर्षभरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ या विद्यापीठांच्या कुलगुरू निवडीच्या प्रक्रिया पार पडल्या.आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची कुलगुरू निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून येत्या 4 जानेवारी रोजी पाच उमेदवारांमधून एकाची कुलगुरू म्हणून वर्णी लागणार आहे. डॉ. संजय ढोले आणि डॉ. विलास खरात तसेच कोल्हापूर विद्यापीठाचे डॉ. विजय फुलारी, ज्योती जाधव आणि प्रा.राजेंद्र काकडे यांच्यापैकी एकाच्या गळ्यात कुलगुरू पदाची माळ पडणार आहे.
  अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी येत्या 11 जानेवारीला अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी पात्र उमेदवारांना बोलावण्यात आले असून त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.संदेश जाडकर, भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.संजय ढोले, बायोटेक्नॉलॉजी विभागाचे डॉ.राजू गच्छे तसेच कोल्हापूर विद्यापीठाचे डॉ.विजय फुलारी यांच्या नावाचा समावेश आहे. आत्तापर्यंतच्या सर्व विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या शर्यतीत या उमेदवारांचीच नावे चर्चेत राहिली आहेत.त्यात डॉ.संजय ढोले हे बहुतांश सर्व विद्यापीठांच्या पहिल्या पाच उमेदवारामध्ये आले आहेत. त्यामुळे आता यातीलच एखाद्या उमेदवारांची निवड कुलगुरू पदी होणार की दुसऱ्या व्यक्तीची होणार ? हे येणारा काळाच ठरवणार आहे.दरम्यान, सर्व पात्र उमेदवारांची यादी प्राप्त होऊ शकली नाही.