महाविद्यालयांना तज्ज्ञ मिळेनात; ‘तासिका’च्या मानधनात घसघशीत वाढ

उद्योग किंवा व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित केलेले तज्ज्ञ किंवा अनुभवसंपन्न ज्येष्ठ अभियंता यांना मार्गदर्शनपर व्याख्यानासाठी आता दीड हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

महाविद्यालयांना तज्ज्ञ मिळेनात; ‘तासिका’च्या मानधनात घसघशीत वाढ
Increase in emoluments of visiting faculty

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

तंत्र शिक्षण संचालनालयाच्या (Technical Education) अधिपत्याखालील अभियांत्रिकी (Engineering), वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अॅन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी (Hotel Management), व्यवस्थापन महाविद्यालये, तंत्रनिकेतने या संस्थांमध्ये अध्यापनासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना मानधनावर बोलविले जाते. पण अल्प मानधनामुळे तज्ज्ञ मिळत नसल्याने तसेच अध्यापनाचा दर्जा टिकविणे शक्य होत नसल्याने राज्य सरकारने (Maharashtra Government) मानधनात घसघशीत वाढ केली आहे.

तज्ज्ञ व्यक्तींना निमंत्रित करून अध्यापन किंवा मार्गदर्शनाकरिता त्यांच्या सेवा वेळोवेळी घ्याव्या लागतात. या क्षेत्रांतील अनुभवी, तज्ञ मान्यवरांना अल्प मानधनाच्या आधारे आकर्षित करून अभ्यासक्रमाचा दर्जा टिकविणे सद्यस्थितीत जिकिरीचे होत आहे. त्यानुषंगाने तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील अभ्यासक्रमांकरिता निमंत्रित करण्यात येणाऱ्या अभ्यागत अध्यापकांच्या मानधनात सुधारणा करण्यात आली आहे.

हेही वाचा : ‘मॉडर्न’च्या शिरपेचात मानाचा तुरा; रिझर्व्ह बॅंकेकडून मिळणार अनुदान

सुधारित मानधनानुसार, उद्योग किंवा व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित केलेले तज्ज्ञ किंवा अनुभवसंपन्न ज्येष्ठ अभियंता यांना मार्गदर्शनपर व्याख्यानासाठी आता दीड हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. पुर्वी हे मानधन एक हजार रुपये एवढे होते. पदवी/ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी आमंत्रित अभ्यागत अध्यापकांचे मानधन ६०० रुपयांवरून ९०० रुपये करण्यात आले आहे. तर प्रात्यक्षिकांसाठीचे मानधन ३०० वरून ४५० इतके केले आहे.

पदविका अभ्यासक्रमासाठी आमंत्रित अभ्यागत अधिव्याख्यातांना यापुढे ५०० ऐवजी ८०० रुपये मानधन दिले जाईल. या अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिकांसाठीचे मानधन ४०० रुपये असेल. यापूर्वी हे मानधन २५० एवढे होते. पदवी/ पदव्युत्तर महाविद्यालयांतील नियमित आस्थापनेवरील अध्यापकांनी त्यांच्या पदानुसार निश्चित तासिकांपेक्षा जास्त तासिका घेतल्यास अतिरिक्त मानधनात १५० रुपयांनी वाढ केली आहे. आता हे मानधन ४५० रुपये तर प्रात्यक्षिकांसाठी २२५ रुपये दिले जाईल. पदविका अभ्यासक्रमांसाठी हे मानधन अनुक्रमे ४०० रुपये व २०० रुपये करण्यात आले आहे.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

सुधारित मानधनासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अभ्यागत अध्यापक निमंत्रित करण्यापूर्वी संस्थेतील संबंधित विद्याशाखेतील सर्व कार्यरत शिक्षकांना प्रमाणकानुसार शैक्षणिक भार दिला आहे, याबाबत संबंधित संस्थेने खात्री करायला हवी. सेवानिवृत्त अध्यापक वा संबंधित अभ्यासक्रमाशी निगडित उद्योग क्षेत्रातील/ व्यवसायातील अनुभवसंपन्न व्यक्तींना, तासिका तत्त्वावरील अध्यापनासाठी निमंत्रित करण्यात यावे. मात्र, सेवा प्रवेश नियमांतील तरतुदीनुसार विहित करण्यात आलेली किमान शैक्षणिक अर्हता व अनुभव अभ्यागत अध्यापकांनी धारण करणे आवश्यक असेल.

तासिका तत्त्वावरील अध्यापकांची नियुक्ती एका शैक्षणिक वर्षासाठी कमाल ९ महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करता येईल. सदर कालावधी संपुष्टात आल्यानंतर सदर नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल. तासिका तत्वावरील कोणत्याही उमेदवारास एकाच महिन्यात त्यांच्या दर्जाच्या अनुज्ञेय वेतनश्रेणीतील सुरूवातीच्या वेतनश्रेणीच्या रकमेपेक्षा जास्त मानधन द्यावे लागू नये, याची जबाबदारी संबंधित महाविद्यालय/ तंत्रनिकेतनाच्या प्राचार्यांची असेल. अतिरिक्त खर्चास अतिरिक्त निधी मंजूर करण्यात येणार नाही. त्यासाठी येणारा खर्च हा संस्थेकडे उपलब्ध असणाऱ्या निधीतून मंजूर अनुदानातून करणे आवश्यक असेल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.