दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी

विद्यार्थ्यांना सोमवारी दुपारी १  वाजल्यापासून संकेतस्थळावरून निकालाची प्रत डाऊनलोड करून त्याची प्रिंट घेता येईल.

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (The Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education) जुलै ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल (supplementary exam results) २८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या ‌www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

हेही वाचा : शिक्षण viral video : विद्यापीठ कर्मचा-याची मुक्ताफळ ;मार्कशीटसाठी विद्यार्थ्यांकडून घेतले पैसे


राज्य मंडळाच्या नऊ  विभागीय मंडळांमार्फत इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत तर बारावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली. विद्यार्थ्यांना सोमवारी (२८ ऑगस्ट) दुपारी १  वाजल्यापासून संकेतस्थळावरून निकालाची प्रत डाऊनलोड करून त्याची प्रिंट घेता येईल. विद्यार्थ्यांना गुण पडताळणी , उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत व पुनर्मूल्यांकन या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथमतः ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.छायाप्रत मिळाल्यापासून पुढील पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यापद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.