विद्यापीठाकडून संघटनांसाठीची प्रस्तावित एसओपी तयार ; येत्या ८ जानेवारीला बैठकीचे आयोजन

विद्यापीठाने प्रस्तावित एसओपी तयार केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना आंदोलन करायचे असेल तर पाच दिवस आधी पूर्वसूचना द्यावी लागेल.

विद्यापीठाकडून संघटनांसाठीची प्रस्तावित एसओपी तयार ; येत्या ८ जानेवारीला बैठकीचे आयोजन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) काही दिवसांपूर्वी विविध संघटनांच्या वादातून निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने विद्यार्थी संघटनांसाठी (For student organizations) प्रस्तावित एसओपी (SOP) तयार केली आहे. संघटनांचे अध्यक्ष व सचिव (President and Secretary of Associations) यांच्याशी चर्चा करून त्यास अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनामुळे वाद निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विद्यार्थी संघटनांमुळे विद्यापीठात काही दिवसांपूर्वी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे कधी नव्हे ते विद्यापीठ आवारात पोलिसांनी १४४ कलम लागू केले. त्याचप्रमाणे विद्यापीठात आंदोलन करण्यासाठी एसओपी तयार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.  विद्यापीठाने सध्या प्रस्तावित एसओपी तयार केली आहे. त्यात नमूद केल्यानुसार विद्यार्थ्यांना आंदोलन करायचे असेल तर पाच दिवस आधी त्याची पूर्वसूचना द्यावी लागेल, विद्यापीठ प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनाकडून सुद्धा आंदोलनाची परवानगी घ्यावी लागेल. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित संघटना त्यास जबाबदार राहील. तसेच आंदोलनामुळे विद्यापीठाच्या स्थावर व जंगम मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल, त्याचप्रमाणे आंदोलनाबाबत संबंधितांकडून हमीपत्र लिहून घेतले जाईल, अशी प्रस्तावित एसओपी आहे.

हेही वाचा : नववी ते उच्च शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमात निवडणूक प्रक्रियेचा होणार समावेश

"विद्यापीठाने जाहीर केल्याप्रमाणे विद्यार्थी संघटनांबरोबर 'एसओपी' बाबत चर्चा केली जाणार आहे. विद्यापीठाने सध्या प्रस्तावित 'एसओपी' तयार केले असून त्यावर येत्या 8 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता विद्यापीठात बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीस संबंधित संघटनेचे अध्यक्ष व सचिव या दोघांना बोलवले जाणार आहे. त्यानंतर अंतिम एसओपी तयार केली जाईल. "

- डॉ. विजय खरे, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे