प्रजासत्ताक दिन पथसंचलन : पुणे विद्यापीठातील चार स्वयंसेवक, एका संघनायकाची निवड
दिल्ली येथील कर्तव्यपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील विविध विद्यापाठातून १२ स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेले हे सर्व विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेचे आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनी (Republic Day) २६ जानेवारी २०२५ रोजी दिल्ली येथील कर्तव्यपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील विविध विद्यापाठातून १२ स्वयंसेवकांची निवड (12 Volunteer Selection) करण्यात आली आहे. निवड झालेले हे सर्व विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेचे आहेत. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कविता शेवरे के.टी.एच.एम. महाविद्यालय नाशिक, वेदिका राजमाने भारती विद्यापीठ महिला अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे, पूजा भोंडगे हुजूरपागा श्रीमती दुर्गाबाई महिला मुकुंदास लोहिया महिला वाणिज्य महाविद्यालय पुणे, स्वरूप ठाकरे एन.व्ही.पी. मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, लासलगाव, नाशिक असे चार स्वयंसेवक आणि महाराष्ट्र व गोवा संघाचे संघनायक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जिल्हा समन्वयक डॉ. पवन शिंगारे यांची निवड झालेली आहे.
महाराष्ट्रातून निवड झालेल्या १२ स्वयंसेवकांपैकी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा उंचावणारी व गौरवाची बाब आहे. निवड झालेले विद्यार्थी १ जानेवारी २०२५ रोजी दिल्लीकडे रवाना होणार असून २६ जानेवारी २०२५ रोजी कर्तव्य पथावर होणाऱ्या राष्ट्रीय पथसंचलनामध्ये सहभागी होणार आहेत.
प्रजासत्ताक दिन पथसंचलन हा भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि लष्करी सामर्थ्याचा उत्सव साजरा करणारा एक प्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे. पथसंचलनामध्ये भारतीय सशस्त्र दल, निमलष्करी दल आणि एन.एस.एस.सारख्या विविध तुकड्या सहभागी होतात. सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि संघनायकाचे अभिनंदन केले.