MPSC चे विद्यार्थी मध्यरात्री रस्त्यावर; पोलिसांनी घेतले ताब्यात
परीक्षा पद्धतीत अचानक झालेल्या बदलामुळे आणि १ नोव्हेंबर २०२५ ही वयोमर्यादा ग्राह्य धरल्याने अनेक पात्र उमेदवार अपात्र ठरत असल्याचा संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. या मागण्यांसाठी पुण्यातील शास्त्री रोडवर एमपीएससी परीक्षार्थींकडून आंदोलन करण्यात आलं.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षा (गट ‘ब’) २०२५ (Joint Preliminary Examination (Group ‘B’) 2025) मधील वयोमर्यादेच्या अन्यायकारक अटीविरोधात (Unfair age restrictions) विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन (Protest in Pune) केले. परीक्षा पद्धतीत अचानक झालेल्या बदलामुळे आणि १ नोव्हेंबर २०२५ ही वयोमर्यादा ग्राह्य धरल्याने अनेक पात्र उमेदवार अपात्र ठरत असल्याचा संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. या मागण्यांसाठी पुण्यातील शास्त्री रोडवर एमपीएससी परीक्षार्थींकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जवळ आली असताना PSI वयोमर्यादा वाढीबाबत सरकारचे मौन गंभीर आहे. PSI परीक्षेची जाहिरात 7–8 महिने उशिरा निघाल्यामुळे हजारो पात्र उमेदवार वयोमर्यादेबाहेर गेले आहेत. ही चूक विद्यार्थ्यांची नसून शासनाच्या अपयशी नियोजनाची आहे. आधीच बेरोजगारी गंभीर असताना, मेहनती तरुणांवर अन्याय होतो आहे. सरकारने तात्काळ PSI वयोवाढीचा निर्णय घ्यावा आणि हजारो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी असल्याचा विश्वास डॉ. स्नेहाताई सोनकाटे, पुणे शहर युवा आघाडीचे शहराध्यक्ष सागर आल्हाट यांच्याकडून विद्यार्थ्यांना देण्यात आला.
M.P.S.C विद्यार्थ्यासाठी परीक्षेची जाहिरात 7 महिने उशिरा आल्याने अनेक विद्यार्थी वयोगटात बसत नसल्याने परीक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री कार्यालयाला, सर्व अधिकार्यांशी संपर्क करून तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे खासदार मेधा कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.