गुजरातच्या शाळेतून 'प्रेरणा' घेण्यास पुण्याच्या विद्यार्थ्यांचा नकार ? 

पुणे वगळता इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. पुण्यातील एकाही शाळेच्या विद्यार्थ्याने अद्याप अर्ज केलेला नाही.

गुजरातच्या शाळेतून 'प्रेरणा' घेण्यास पुण्याच्या विद्यार्थ्यांचा नकार ? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

गुजरात मधील वडनगर येथील प्रेरणा शाळेत (At Prerna School in Vadnagar, Gujarat) विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तांत्रिक व व्यवहारिक हालचालींच्या माध्यमातून 'प्रेरणा द स्कूल ऑफ एक्सपेरिअन्शिअल लर्निंग'  (Prerna The School of Experiential Learning) या कार्यक्रमांतर्गत बहुमुल्य असे मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. परंतु.त्यात पुणे वगळता इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. पुण्यातील एकाही शाळेच्या विद्यार्थ्याने अद्याप अर्ज केलेला नाही. त्यामुळे या शाळेत जाऊन प्रशिक्षणाचा अनुभव घेण्यास विद्यार्थी उत्सुक नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

'प्रेरणा द स्कूल ऑफ एक्सपेरिअन्शिअल लर्निंग' या कार्यक्रमांत इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. केंद्रीय शिक्षण विभाग व शालेय शिक्षण व साक्षरता विभागातर्फे याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. गुजरात मधील वडनगर येथील प्रेरणा शाळेत दहा जिल्ह्यातील २०० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यातील 100 मुले व 100 मुली यांच्यातील निवडक 200 विद्यार्थ्यांसाठी एक आठवडा निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. नोंदणीकृत 100 मुले व 100 मुली यांच्यातील निवडक 200 विद्यार्थ्यांपैकी छाननी करून पुणे जिल्ह्यातून 10 मुले व दहा  मुली 10 निवडल्या जाणार आहेत. त्यातील एका मुलीला व एका मुलाला राज्य पातळीवर पाठवले जाणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हेही वाचा : शिक्षण 'बीएड सीईटी'चा अर्ज भरताना होऊ शकतो गोंधळ ; तीन स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा

'प्रेरणा द स्कूल ऑफ एक्सपेरिअन्शिअल लर्निंग' या कार्यक्रमांसाठी 3 जानेवारीपासूनच विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील 7, रत्नागिरी व गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येकी 12, गोंदिया मधील 17, जालन्यातील 33, साताऱ्यामधील 60, हिंगोलीतील 75, उस्मानाबाद व  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मधील प्रत्येकी 79,  नांदेड व  वर्ध्यातील 116 , सांगलीतील 161, कोल्हापूर मधील 189 तर भंडारा जिल्ह्यातील 208 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. मात्र, पुण्यातील एकही विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यामुळे जिल्ह्यातील शाळांमधील मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची नोंदणी करून त्याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करावा ,असे आदेश पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत.