येरवडा व हवेलीतील ‘आयटीआय’ला जिल्हा नियोजन समितीकडून मिळणार निधी

मुंबईत आयोजित कौशल्य विकास विभागाच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना याबाबत सुचना दिल्या.

येरवडा व हवेलीतील ‘आयटीआय’ला जिल्हा नियोजन समितीकडून मिळणार निधी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यातील (Pune) येरवडा येथे नवीन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण (ITI) संस्थेला मान्यता देण्यात आली आहे. या संस्थेप्रमाणेच हवेली येथील शासकीय औद्योगिक संस्थेला जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुणे येथील औद्योगिक संस्थांना उपयुक्त ठरणारे व्यावसायिक अभ्यासक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये सुरू करावेत, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Dy CM Ajit Pawar) यानी दिली.

 

मुंबईत आयोजित कौशल्य विकास विभागाच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. या बैठकीला कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता  विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सुनील टिंगरे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, मुख्य अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते.

पुण्यात पुन्हा कोयत्याची दहशत; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला

पुणे परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास सुरू आहे. या विकासात स्थानिक तरुणांना सामावून घेणे आवश्यक आहे. यादृष्टीने पुणे जिल्ह्यातील येरवडा आणि हवेली येथील नवीन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची उभारणी जलद गतीने करावी. या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये स्थानिक उद्योगांसाठी उपयुक्त ठरणारे अभ्यासक्रम सुरू करावेत, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना पवारांनी यावेळी दिले. 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला लोहगाव येथे ५ एकर जागा देण्यात आली आहे. या जागेत प्रशासकीय इमारत आणि कार्यशाळेचे बांधकाम करण्याबाबतचा सुनियोजित आराखडा तयार करा. ही संस्था सर्वसाधारण गटात मोडणारी असल्याने बांधकामासाठी लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेमधून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्याचे निर्देश पवारांनी बैठकीत दिले.

पुणे परिसरात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना पारंपरिक अभ्यासक्रम शिकवण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व स्थानिक गरजा विचारात घेऊन इंडस्ट्री ४.० अंतर्गत रोबोटिक्स, सीएनसी मशीन हँडलिंग, मेकॅनिक्स यासारखे अभ्यासक्रम उपलब्ध करून द्यावेत. यामुळे परिसरात सुरू असलेल्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी मंजूर करण्यात आलेल्या पदांपैकी निकडीची पदे तत्काळ भरण्याची प्रक्रिया सुरू करा. याबाबत संबंधितांनी प्राधान्याने कार्यवाही करावी, असे सूचित केले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j