रॅप साँग राहिले बाजूला, विद्यार्थी संघटनांमध्येच शाब्दिक चकमक

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये (NCP) शाब्दिक चकमक सुरू झाली आहे.  एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.

रॅप साँग राहिले बाजूला, विद्यार्थी संघटनांमध्येच शाब्दिक चकमक
ABVP vs NSC

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) चित्रित करण्यात आलेल्या रॅप साँगवरून एकीकडे विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले जात आहे. तर आता या गाण्यावरून दोन विद्यार्थी संघटना आमनेसामने आल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये (NCP) शाब्दिक चकमक सुरू झाली आहे.  एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. (SPPU Rap Song Case)

अभाविपकडून सोमवारी विद्यापीठात आंदोलन करून व्यवस्थापन परिषदेची बैठक उधलून लावली. यावेळी एका सभागृहाच्या दरवाजाच्या काचा फुटल्याने अभाविपच्या कार्यकर्त्यांनीच ही तोडफोड केल्याचा दावा राष्ट्रवादीसह इतर काही संघटनांनी केला. त्यावर ‘अभाविप’कडून राष्ट्रवादीवर टीका करण्यात आली आहे. विशिष्ट राजकीय नेत्यांकडून ’’तोडफोड झाली’’ ही अतिशय चुकीची बातमी पसरवली गेली. तसे बघितले तर ह्याच सन्मानीय राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ह्या रॅपरवर कारवाई करू नये, ही मागणी केली होती. त्यामुळे नैतिकतेवर ह्यांनी किती बोलावे हे मोठे प्रश्नचिन्हच आहे, अशी टीका अभाविपकडून राष्ट्रवादीच नाव न घेता करण्यात आली आहे.

हेही वाचा : कुलगुरूंच्या हीन वागणुकीमुळे कार्यकर्ते आक्रमक; तोडफोड केली नसल्याचा ABVP चा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनीही अभाविपवर टीकेचे बाण सोडले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठात धुडगूस घालत विद्यापीठाच्या चालू बैठकीत शिरून गोंधळ घातला आणि या पलीकडे जाऊन कार्यालयाच्या दारांच्या काचा देखील फोडल्या गेल्या. विद्यापीठ प्रशासनाने रॅप साँग ला परवानगी देऊन चूक केली हे मान्यच. मात्र त्यांच्या या कृतीचा याप्रकारे धुडगूस घालून, फोडाफोडी करून निषेध करण्याच्या कृतीचे समर्थन कसे करता येईल, असे गव्हाणे यांनी म्हटले आहे.

अभाविपचे वरिष्ठ पदाधिकारी त्याचबरोबर अभाविप चे मार्गदर्शक असलेले भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या कृतीचे समर्थनच करतील. समाजामध्ये भेदाभेद करून, सतत सातत्याने प्रत्येक घटना आणि मुद्यां च्या बाबतीत हिंसक आक्रमक मांडणी करून राजकारण करण्याचे भाजप आणि आर एस एस च्या नेत्यांचे तंत्र हे समाजाला आणि देशाला घातकच होते आणि आजही आहे, अशी टीका गव्हाणे यांनी केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कोणत्या प्रकारच्या मानसिकतेचे तरुण उभे करायचे आहेत, हे इतिहासात घडलेल्या असंख्य घटनांवरून स्पष्ट झालेच आहे आणि आजही ते हेच करत आहेत. खरा प्रश्न विद्यार्थी तरुणांनी आणि त्यांच्या पालकांनी समजून घेण्याचा आहे. आपण कोणत्या दिशेला आपल्याला घेऊन जात आहोत याचा विचार करण्याचा. कालच्या घटनेमुळे ज्या तरुणांवर गुन्हे दाखल झाले ते आणि त्यांचे पालक विचार करणार का? हा मुळ प्रश्न असल्याचे गव्हाणे यांनी म्हटले आहे.