अतिरिक्त शुल्कासाठी विद्यार्थ्यांचा निकाल ठेवला राखून; शाळेविरोधात पोलिसांकडे तक्रार

शाळा व्यवस्थापनाने ओळखपत्र, डायरी, ई-लर्निंगची अतिरिक्त फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल देण्यास नकार दिला आहे.

अतिरिक्त शुल्कासाठी विद्यार्थ्यांचा निकाल ठेवला राखून;  शाळेविरोधात पोलिसांकडे तक्रार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

रायगड जिल्ह्यातील उरण येथील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित युईएस शाळेने (UES School Uran) पालकांकडे अतिरिक्त शुल्काची मागणी (Demand for additional fees) केली. तसेच शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले (Students' results withheld) आहेत. त्यामुळे पालक संघटना आक्रमक झाल्या असून शाळेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार (Complaint against school in police station) दाखल केली आहे. शाळा व्यवस्थापनाने ओळखपत्र, डायरी, ई-लर्निंगची अतिरिक्त शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी कायद्याचा मार्ग निवडला आहे. 

विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवल्याने शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांनी संताप व्यक्त केला आहे. शाळाने विद्यार्थ्यांकडून ओळखपत्राच्या नावाखाली ५५०, डायरी - १००, ई-लर्निंग-१२०० अशा अतिरिक्त शुल्काची मागणी केली. अतिरिक्त शुल्काची रक्कम शाळा व्यवस्थापनाकडून वसूल केली जात असल्याचा आरोप करत पालक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांनी विरोध केला आहे. 

या प्रकरणाची उरण समितीच्या शिक्षण विभागात तक्रार करण्यात आली आहे. यावेळी ओळखपत्र, डायरी यांसारख्या अतिरिक्त शुल्कासाठी विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवता येणार नसल्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर आक्रमक पालकांनी शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात कॅपिटेशन अॅक्ट तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेण्याची मागणी पोलिस ठाण्यात केली आहे.