शाळा, कॉलेजमध्ये घुमणार 'जय जय महाराष्ट्र माझा' चे सूर ? अमित ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक अधिकृत शासकीय कार्यक्रमात ह्या राज्य गीताचे गायन करणे किंवा ध्वनिमुद्रित स्वरूपात ते लावणे अपेक्षित आहे आणि ते लावले जावेच हा आमचा आग्रह आहे: अमित ठाकरे

शाळा, कॉलेजमध्ये घुमणार 'जय जय महाराष्ट्र माझा' चे सूर ? अमित ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालयांमध्ये 'जय जय महाराष्ट्र माझा' (Jai Jai Maharashtra maja) हे आपले "राज्यगीत" लावण्याचा शासन अध्यादेश प्रसिद्ध करावा, अशी  मागणी मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकानाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक अधिकृत शासकीय कार्यक्रमात ह्या राज्य गीताचे गायन करणे (Singing of the national anthem) किंवा ध्वनिमुद्रित स्वरूपात ते लावणे अपेक्षित आहे आणि ते लावले जावेच हा आमचा आग्रह आहे, असे त्यांनी पत्रात नमुद केले आहे. 

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून एक पत्र लिहीलं आहे. शासकीय परिपत्रकानुसार, राज्यातील प्रत्येक शाळेत आणि महाविद्यालयात अध्ययन वर्ग सुरू होण्यापूर्वी “जन गण मन अधिनायक जय हे…” ह्या आपल्या राष्ट्रगीताचे गायन करणे अनिवार्य आहे. राष्ट्रगीताचा मान राखण्याबाबत शालेय स्तरापासून ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांवर जाणीवपूर्वक संस्कार केले जातात, त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राच्या राज्य गीताचे महत्व भावी पिढ्यांना- विद्यार्थ्यांना पटवून देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना राज्य गीताचा उचित सन्मान राखण्याची सवय लावण्यासाठी प्रत्येक शाळा तसंच महाविद्यालयात राज्य गीताचे गायन अनिवार्य करणे आवश्यक  आहे. त्याचबरोबर शाळा आणि महाविद्यालयांत प्रवेश करताच विद्यार्थी सहज वाचतील, अशा ठिकाणी म्हणजे शैक्षणिक संस्थेच्या इमारतीच्या दर्शनी भागात एका मोठ्या फलकावर अथवा भिंतीवर ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…’ हे संपूर्ण राज्य गीत लिहावे. त्याला कायमस्वरुपी ठळक प्रसिद्धी देण्याचे आदेश आपण सर्व शैक्षणिक संस्थांना द्यावेत. त्याच प्रमाणे  प्रत्येक सरकारी कार्यालयाच्या दर्शनी भागातही आपले राज्य गीत लावण्यात यावे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या या मागण्यांचा आपण गांभीर्याने विचार करावा, ही विनंती.  २७ फेब्रुवारी. ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या पूर्वसंध्येला आपण याबाबतचा शासकीय आदेश काढला तर सर्वांना निश्चितच आनंद होईल, असेही त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.