एसपीएम पब्लिक स्कूलमध्ये आता अकरावी-बारावीचे वर्ग; नीट, जेईई, सीईटीचे प्रशिक्षणही मिळणार

शि.प्र.मंडळी तर्फे सीबीएसई विभागाच्या इमारतीमध्ये जेईई/नीट/एमएचटी-सीईटी/आयआयटी फाऊंडेशन साठी आयपीई (इन परस्युट ऑफ एक्सलन्स) प्रशिक्षण केंद्र विकसित करण्यात येत आहे.

एसपीएम पब्लिक स्कूलमध्ये आता अकरावी-बारावीचे वर्ग; नीट, जेईई, सीईटीचे प्रशिक्षणही मिळणार
SPM Public School

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षण प्रसारक मंडळीच्या (Shikshan Prasarak Mandali) एसपीएम पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (SPM Public School) पूर्व प्राथमिक ते दहावी पर्यंतच्या शिक्षणासोबतच आता इयत्ता अकरावी आणि बारावीचे वर्ग देखील सुरु होत आहेत. सीबीएसई बोर्डकडून (CBSE Board) त्यासाठी मान्यता मिळाली आहे, अशी माहिती शि.प्र.मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन (Adv. S. K. Jain) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला नियामक मंडळ उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, शाला समिती अध्यक्ष सतिश पवार, शाळेच्या प्राचार्या डॉ. अपर्णा मॉरिस यांच्यासह नियामक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. शि.प्र.मंडळी कार्यालया शेजारी स्थित शाळेच्या मुख्य इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर इयत्ता ११ वी व १२ वी चे वर्ग सुरु होणार असून सिनीयर सेकंडरी विभाग म्हणजे ज्यूनियर कॉलेज मधील विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेचे शिक्षण सर्व अद्ययावत सुविधांसह मिळणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

11th Admission : पसंतीक्रम काळजीपुर्वक भरा, अन्यथा एका फेरीतून व्हाल बाद; सविस्तर माहिती व वेळापत्रक पहा...

डॉ. अपर्णा मॉरिस म्हणाल्या, २०१० मध्ये २२ विद्यार्थ्यांपासून झालेली सुरुवात आज १९५२ विद्यार्थी संख्येपर्यंत पोहोचली आहे. यंदा दहावीची पहिली बॅच शंभर टक्के निकालासह उत्तीर्ण झाली असून त्यापार्श्वभूमीवर आता सिनीयर सेकंडरीचे शिक्षण देखील याच इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

जेईई/नीट/सीईटी चे प्रशिक्षण केंद्र

शि.प्र.मंडळी तर्फे सीबीएसई विभागाच्या इमारतीमध्ये जेईई/नीट/एमएचटी-सीईटी/आयआयटी फाऊंडेशन साठी आयपीई (इन परस्युट ऑफ एक्सलन्स) प्रशिक्षण केंद्र विकसित करण्यात येत आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, उच्चविद्याविभूषित शिक्षक यांच्याकडून शिकण्याची संधी  विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सर्व प्रकारच्या सामाजिक व आर्थिक गटातील विद्यार्थ्यांना समाविष्ट होता येईल, ही गोष्ट समोर ठेऊन शुल्क रचना देखील करण्यात आली आहे. जेईई आणि नीट चे अभ्यासक्रम पूर्ण करुन अभियांत्रिकी आणि आरोग्य क्षेत्रातील करिअरच्या वाटा विद्यार्थ्यांसाठी खुल्या होणार आहेत. त्याकरिता अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन व समुपदेशन विद्यार्थ्यांना मिळेल, असे अ‍ॅड.एस.के.जैन यांनी सांगितले.

आयपीई प्रशिक्षण केंद्रांतर्गत इयत्ता ८वी, ९वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांकरिता फाऊंडेशन कोर्स सुरु करण्यात येणार आहे. कोचिंग सेंटर ला वाईड सायन्स इन्स्टिट्यूट यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. आय.पी.ई. सेंटर मधून अधिकाधिक विद्यार्थी आय.आय.टी. साठी पात्र व्हावेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे वाईड सायन्स इन्स्टिट्यूट शिरूर चे संस्थापक चेअरमन दीपक होनराव यांनी यावेळी नमूद केले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo