NEET UG 2024 परीक्षेचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल

वैद्यकीय प्रवेश परीक्षा रद्द केली जाणार नाही. तसेच या परीक्षेच्या निकालाच्या आधारे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या समुपदेशनावर कोणतीही बंदी असणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.

NEET UG 2024 परीक्षेचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेल्या NEET UG 2024 परीक्षेसंदर्भात अखेर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निकाल दिला आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET UG 2024) रद्द केली जाणार नाही. तसेच या परीक्षेच्या निकालाच्या आधारे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या समुपदेशनावर कोणतीही बंदी असणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ८ जुलै रोजी होणार आहे.

वैद्यकीय(Medical), दंत (dental), आयुष (ayush) आणि नर्सिंग (nursing) पदवीधर प्रवेशांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे 5 मे रोजी घेतलेल्या राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा - (UG NEET UG) 2024 चा निकाल 4 जून रोजी घोषित करण्यात आला होता. या परीक्षेतील कथित अनियमिततेमुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर विरोध होत असताना परीक्षा रद्द करण्याची आणि पुन्हा आयोजित करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर मंगळवार 1 जून रोजी सुनावणी पार पडली.

या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ (vikram nath) आणि न्यायमूर्ती एहसानुद्दीन अमानुल्ला (ehsaddun amanulla) यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार होती. याचिकाकर्ते डॉ. विवेक पांडे (vivek pandey) तसेच शिवांगी मिश्रा (shivangi mishra) आणि इतर विद्यार्थ्यांनी या याचिकेद्वारे NTA ला NEET UG 2024 रद्द करून पुन्हा आयोजित करण्याची विनंती केली होती.

1 जून रोजी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या या याचिकेत असे म्हटले होते की,  "NEET UG 2024 परीक्षेचा पेपर फुटल्याच्या आरोपांची बिहार पोलिसांकडून आधीच चौकशी केली जात आहे. त्याचप्रमाणे, NTA द्वारे अनेक विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यास आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात अब्दुल्ला मोहम्मद आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे डॉ. शेख रोशन यांनीही दाखल केली आहे. विद्यार्थ्यांना ग्रेस गुण मिळण्यामागे कोणतेही तार्किक कारण नसून ते वेळेचा अपव्यय असल्याचे याचिकाकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. तसेच,  NEET UG 2024 माहिती बुलेटिनमध्ये या संदर्भात NTA कडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही."

दरम्यान, आंध्र प्रदेशातील NEET UG  अर्जदार जरीपट कार्तिक यांनी घटनेच्या कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत एनटीएच्या १ हजार ५३६ विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. वाय बालाजी आणि चिराग शर्मा या वकिलांच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाला 'तातडीची सुनावणी'  करण्याची विनंती करण्यात आली आहे.