शिक्षक भरतीचा अडसर दूर; आचार संहितेमधून सूट : शिक्षण आयुक्त सूरज मांढरे

समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयांप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे.

शिक्षक भरतीचा अडसर दूर; आचार संहितेमधून सूट : शिक्षण आयुक्त सूरज मांढरे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे (Department of School Education) पवित्र पोर्टल (pavitr portal)मार्फत राबविण्यात येणाऱ्या पदभरतीसाठी पदवीधर / शिक्षक मतदार संघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल,अशी कोणतीही कृती घडणार नाही, याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरती (Teacher Recruitment)बाबतची प्रक्रिया राबविण्यास मान्यता प्राप्त झाली आहे.त्यामुळे रखडलेली शिक्षक नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी अनेक नवनियुक्त शिक्षकांना कामावर रुजू होता येणार आहे.

शिक्षण विभागातर्फे २५ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्ती बाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येईल. दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयांप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे,अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी बुलेटीनद्वारे दिली आहे.

माजी सैनिक या समांतर आरक्षणातील पदे रूपांतरित करण्यास ना हरकत प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालयास समक्ष भेट देऊन प्रस्ताव सादर केला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलद गतीने मान्यता देण्यासाठी विनंती केली आहे. समांतर आरक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाअंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीची व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये. बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल,असेही सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.