Savitribai Phule Pune University : विद्यापीठाच्या संस्कृत प्राकृत विभागातील हस्तलिखिते अभ्यासक व संशोधकांना एका क्लिकवर उपलब्ध होणार 

हस्तलिखितांच्या संगणकीय विवरणात्मक सूचीसाठीचा सामंजस्य करार

Savitribai Phule Pune University : विद्यापीठाच्या संस्कृत प्राकृत विभागातील हस्तलिखिते अभ्यासक व संशोधकांना एका क्लिकवर उपलब्ध होणार 
Savitribai Phule Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क :

Savitribai Phule Pune University News : भारतीय ज्ञान परंपरेचा प्राचीन आणि सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे हस्तलिखिते. ज्ञानशाखेच्या मूळ पाठ्यपुस्तकांचे सिद्धांत आणि विवेचन यामध्ये आहेत. अशा काही स्तलिखितांचा संग्रह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत प्राकृत विभागामध्ये उपलब्ध आहे. या हस्तलिखितांच्या संगणकीय विवरणात्मक सूचीसाठीचा प्रस्ताव उदयपूर येथील ना - नफा तत्वावर काम करणाऱ्या धरोहर या संस्थेने दिला होता.

विद्यापीठ अधिकार मंडळाने हा प्रस्ताव मान्य केला आहे. शनिवार (ता. 9 डिसेंबर) रोजी हस्तलिखितांच्या संगणकीय विवरणात्मक सूचीसाठीचा सामंजस्य करार करण्यात आला. कुलगुरु प्रा. सुरेश गोसावी (Suresh Gosavi) आणि धरोहर संस्थेचे संचालक संजय सिंघल यांनी प्र - कुलगुरु प्रा. पराग काळकर, कुलसचिव प्रा. विजय खरे, प्रा.संजय ढोले, माजी कुलसचिव कॅप्टन चितळे आदी मान्यवर तसेच संस्कृत प्राकृत विभागाचे विभागप्रमुख प्रा. देवनाथ त्रिपाठी, माजी विभागप्रमुख प्रा. रवींद्र मुळे, प्रा. विनया क्षीरसागर व इतर प्राध्यापक यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

हेही वाचा : State Government Decision : राज्य सरकारचा मोठा निर्णय : सर्व शाळांमध्ये 'सखी सावित्री' समिती स्थापन करण्याच्या सुचना

'' प्राचीन ग्रंथाचे संरक्षण आणि जतन करून त्यातील माहिती पुनरूज्जीवित करून आधुनिक संदर्भात संशोधनासाठी नव्याने उपलब्ध करून देणे ही आजच्या काळाची गरज '' असल्याचे प्रतिपादन कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांनी केले. धरोहर या संस्थेने इतर संस्थाकडील हस्तलिखितांच्या प्रतिमा मिळवून अशा प्रकारचे काम सुरू केले आहे. पावणे आठ हजार हस्तलिखितांची सूची www.sangrah.org या संकेतस्थळावर संस्कृत अभ्यासक आणि कुतूहल असणाऱ्या संशोधकांसाठी उपलब्ध असल्याची माहिती संस्थेच्या संचालकांनी दिली.

भारतीय ज्ञानाचा आणि संस्कृतीचा प्रसार करण्याचा वसा पदरमोड करून ही संस्था करत आहे. त्यात या संस्थेस विद्यापीठाच्या संस्कृत प्राकृत विभागाने महत्वाची हस्तलिखिते उपलब्ध करून दिल्याने संस्थेचा उत्साह शतगुणित झाल्याचेही त्यांनी सांगितले.