पेपर तपासणीतील चुकांबाबत विद्यापीठ ‘मुक’; अभाविपच्या आंदोलनानंतर आली जाग
विद्यार्थ्यांचा निकाल नापास म्हणून आला असून त्यांनी फोटोकॉपी साठी अर्ज केला होता. त्यावेळी असे निदर्शनास आले की संबंधित विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेतील कित्येक प्रश्न तपासण्यातच आले नव्हते.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) रिव्हॅल्यूएशन आणि बॅकलॉगच्या मुद्यावरून बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदेकडून (ABVP Protest) मुक आंदोलन करण्यात आले. काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेतील उत्तरेच तपासली नसल्याच्या तक्रारी आहेत. फेरतपासणीसाठी अर्ज करूनही दोन महिन्यांपासून निकाल नसल्याने विद्यार्थ्यांना (College Students) फटका बसत असल्याचा दावा करत ‘अभाविप’कडून हे आंदोलन करण्यात आले. (Savitribai Phule Pune University News)
विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा निकाल नापास म्हणून आला असून त्यांनी फोटोकॉपी साठी अर्ज केला होता. त्यावेळी असे निदर्शनास आले की संबंधित विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेतील कित्येक प्रश्न तपासण्यातच आले नव्हते. त्यावर मार्किंग व्यवस्थित करण्यात आले नव्हते. परिणामी त्या विद्यार्थ्यांचा निकाल नापास असा आला. विद्यार्थ्यांनी आपले पेपर फेरतपासणी साठी दिले असून २ महिने होऊन देखील त्यांचा निकाल लावण्यात विद्यापीठ प्रशासन अयशस्वी ठरले आहे, असा आरोप अभाविपकडून करण्यात आला आहे.
MBBS ला प्रवेश मिळेल का? राज्यातील शासकीय व खाजगी महाविद्यालयांचे कटऑफ पहा एका क्लिकवर
विद्यापीठ प्रशासनाच्या चाललेल्या या निष्काळजीपणाचा पूर्णपणे परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. या विषयावर विद्यापीठ प्रशासनाला अभाविपच्या शिष्टमंडळाकडून याआधीही चर्चा करून निवेदन देण्यात आले होते. पण तरी काही सकारात्मक परिणाम या विषयात झाला नाही. म्हणून गुरूवारी अभाविप पुणे महानगरच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ प्रशासनाने या विषयावर लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी “मूक आंदोलन” करण्यात आल्याची माहिती अभाविपकडून देण्यात आली.
‘एससी’ विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ; सर्व अभिमत विद्यापीठे, खाजगी महाविद्यालयांना लागू
विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले की, “ज्या विद्यार्थ्यांचा फेरतपासणी मध्ये निकाल पास येईल त्यांच्या मार्कशिट वर नव्याने पासचा शिक्का देण्यात येईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांना फेरतपासणी मध्ये पास होण्याचा विश्वास आहे, त्यांना बॅकलॉगच्या परीक्षा देण्याची गरज नाही. जे विद्यार्थी फेर तपासणीचा अर्ज देऊन बॅकलॉगच्याही परीक्षा देतील त्यांना ज्या परीक्षेत अधिक गुण प्राप्त होतील ते गृहीत धरण्यात येतील. याचसोबत जे विद्यार्थी फेर तपासणी मध्ये पास होतील व ज्यांनी बॅकलॉगचे शुल्क भरले असेल, अशा विद्यार्थ्यांचे शुल्क परत करण्यात येईल,” अशी लेखी ग्वाही परीक्षा संचालकांनी दिल्याची माहिती ‘अभावपि’ने दिली.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.