Recruitment News : भरती परीक्षेत गैरप्रकार नाहीच; वन विभागाकडून मोठा दावा

औरंगाबाद येथील एका करिअर अकादमीवर पोलिसांनी छापा टाकून एक जणाला सोमवारी अटक केली आहे. तसेच या अकादमीच्या संचालकासह अन्य काही जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Recruitment News : भरती परीक्षेत गैरप्रकार नाहीच; वन विभागाकडून मोठा दावा
Forest Department Recruitmnet

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

वन विभागाच्या (Forest Department) भरती परीक्षेदरम्यान (Recruitment Examination) कुठलाही गैरप्रकार झाला नसल्याचा खुलासा वन विभागाने शुक्रवारी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis) यांनी गुरूवारी विधानसभेमध्येही (Maharashtra Assembly) परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाला नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर वन विभागानेही गैरप्रकाराबाबत आलेल्या बातम्या निराधार व चुकीच्या असल्याचे म्हटले आहे.

औरंगाबाद येथील एका करिअर अकादमीवर पोलिसांनी छापा टाकून एक जणाला सोमवारी अटक केली आहे. तसेच या अकादमीच्या संचालकासह अन्य काही जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. वन विभागाच्या परिक्षेसाठी त्यांच्याकडून परीक्षार्थींना उत्तरे सांगितली जात असल्याचे पोलिसांनी त्यावेळी म्हटले होते. त्यावर विधानसभेत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर फडणवीस यांनी कुठलाही गैरप्रकार झाला नसल्याचा म्हटले होते.

पुणे जिल्हा परिषद भरती : एक हजार पदांसाठी जाहिरात, शनिवारपासून भरा अर्ज

शुक्रवारी वन विभागाकडूनही खुलासा करण्यात आला आहे. विभागाने म्हटले आहे की, गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गाची भरती प्रक्रिया टी.सी.एस.- आय.ओ. एन. यांच्यामार्फत ३१ जुलै ११ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन परीक्षेद्वारे (ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न) घेण्यात येत आहे.  प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रश्नपत्रिका शिफ्टनिहाय वितरण करणे, परीक्षा घेणे, निकाल प्रकाशित करणे याबाबतची टीसीएस आयओएन या कंपनीची यंत्रणा ही अत्यंत गोपनीय मजबूत व अत्यंत सुरक्षित आहे. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या बातम्या निराधार, तथ्यहीन व चुकीच्या असल्याचा खुलासा वन विभागाने केला आहे.

वन विभागाची परीक्षा टी.सी.एस.आय.ओ.एन. या कंपनीकडून घेण्यात येत असून वन विभागाकडून परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त लावणे तसेच वरिष्ठांकडून परीक्षा केंद्राची तपासणी करण्याच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. याव्यतिरिक्त उमेदवारांना व नागरिकांना https://mahaforest.gov.in/ या संकेतस्थळावरूनही सूचनावजा आवाहन करण्यात आले असून अतिरिक्त दक्षता घेण्यात आली आहे. याचबरोबर नागपूर येथून परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची गंभीरतेने दखल घेऊन याबाबत सतर्क राहण्याबाबत पोलीस आयुक्त, नागपूर शहर, पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण, पोलीस अधीक्षक, वर्धा, पोलीस अधीक्षक, भंडारा व पोलीस अधीक्षक गोंदिया यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

परीक्षा घेणाऱ्या एजन्सीलाच ‘महाज्योती’कडून डच्चू; प्रवेश परीक्षांबाबत महत्वाची अपडेट

पोलीस विभागाच्या सायबर सेललासुद्धा सतर्क राहण्याचे व भरती प्रक्रियेसंदर्भात समाज माध्यमांमध्ये अफवा पसरवणाऱ्यांवर आवश्यक कार्यवाही करण्याच्याही सूचना देण्यात आलेल्या असल्याचे वन विभागाने कळविले आहे. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या घटना औरंगाबाद जिल्ह्यातील नेमून दिलेल्या सात परीक्षा केंद्रांवरील नसून ती खासगी अॅकेडमी असून त्याबाबत पोलीस यंत्रणेकडून तपास सुरू आहे. यामध्ये उल्लेखित राणा अॅकेडमी परीक्षा केंद्राचा वन विभागाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रामध्ये समावेश नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

या परीक्षेदरम्यान गैरकृत्य करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध रीतसर पोलीस कारवाई करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे. यासंदर्भात वन विभागाचे कक्ष अधिकारी वि. श. जाखलेकर यांनी खुलासा प्रसिद्धीस दिला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD