विधानसभा निवडणुकीमुळे शिक्षक-प्राध्यापकांच्या दिवाळी सुट्ट्यांवर गदा..
राज्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या शाळेतील शिक्षक, विद्यापीठ आणि महाविद्यालयांतील प्राध्यापक व इतर अधिकारी, कर्मचारी यांना या निवडणुकीच्या कामकाजासाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
आगामी विधानसभा निवडणुकीमुळे (Assembly Elections 2024) महाराष्ट्रात वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्यासाठी राज्याचा आढावा घेण्यासाठी आलेल्या निवडणूक आयोगाने (Election Commission) आवश्यक असलेल्या कर्मचारी वर्गाला काही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या शाळेतील शिक्षक, विद्यापीठ आणि महाविद्यालयांतील प्राध्यापक व इतर अधिकारी, कर्मचारी यांना या निवडणुकीच्या कामकाजासाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या हक्काच्या मानल्या जाणाऱ्या दिवाळी सुट्ट्यांवर (Diwali holidays) गदा येण्याची शक्यता असल्याने यावर काही शिक्षक आणि प्राध्यापकांनी नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे.
तर काही शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय कर्तव्याचा एक भाग म्हणून दिवाळी सुट्यांपेक्षा निवडणूक कामकाजासाठी तयारी दर्शवली आहे. अशातच काही शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी नेहमीप्रमाणे शिक्षकांना या कामात गुंतवण्यापेक्षा इतर कर्मचाऱ्यांना त्यासाठी घेण्याची मागणीही सुरू केली आहे.
परीक्षांची तयारी विधानसभेच्या निवडणूक कालावधीतच मुंबई विद्यापीठासह राज्यातील बहुतांश विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर हिवाळी परीक्षेच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे नियोजन केले आहे. त्यात मुंबई विद्यापीठाच्या बीए तृतीय वर्षाच्या परीक्षा या १३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहेत. दुसरीकडे इंजिनिअरिंगच्या लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासोबत इतर काही परीक्षा या ३१ ऑक्टोबरपूर्वी संपविण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. याच कालावधीत निवडणुकांचे कामकाज वाढल्यास मुंबई विद्यापीठासह राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या या सर्व लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांच्या नियोजनात मोठा बदल करावा लागण्याची शक्यत्ता वर्तवली जात आहे.