RTE Admission: आरटीई प्रवेशासाठी उरले शेवटचे दोन दिवस

काही पालकांचा आरटीई प्रवेशाचा अर्ज भरायचा राहून गेल्याने ही मदत 4 जून पर्यंत वाढविण्यात आली आहे. 4 जून नंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही.

RTE Admission: आरटीई प्रवेशासाठी उरले शेवटचे दोन दिवस

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

RTE  Admission: शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (RTE Admission Process)आतापर्यंत 2 लाख 33 हजार 763 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असून प्रवेश अर्ज भरण्यास सोमवार,मंगळवार असे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. त्यानंतर प्रवेश अर्ज भरण्याची मुदत (RTE Admission Application Deadline)संपुष्टात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 46 हजार 842 अर्ज प्राप्त झाले आहेत.

आरटीई प्रवेशासाठी शिक्षण विभागाने 31 मे पर्यंत मुदत दिली होती. मात्र काही पालकांचा अर्ज भरायचा राहून गेल्याने ही मदत 4 जून पर्यंत वाढविण्यात आली. 4 जून नंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही ,असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

आरटीई पोर्टलवर पूर्वी केवळ शासकीय , अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा प्रवेशासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार आता केवळ खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आरटीईचे प्रवेश दिले जाणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाकडून अर्ज स्वीकारले जात आहेत.दरवर्षी आरटीई प्रवेशासाठी सुमारे तीन लाख अर्ज प्राप्त होतात. मात्र,अद्याप अडीच लाखांचा टप्पाही ओलांडला नाही. इच्छुक पालक आपल्या पाल्याचा आरटीई प्रवेशाचा अर्ज https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new या पोर्टलवर जाऊन भरू शकतात. 

प्रवेशासाठी उपलब्ध असणाऱ्या शाळा व एकूण जागांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून 2  मे पर्यंत 9 हजार 210 शाळांमध्ये 1 लाख 5 हजार 161 जागांसाठी आरटी प्रवेशाचे अर्ज स्वीकारले जात आहेत. आरटीई प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यानंतर ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 18 हजार 977 , नागपूर जिल्ह्यात 19 हजार 840, नाशिक जिल्ह्यात 14,186 ,छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात 14 हजार 605 अर्ज प्राप्त झाले आहेत.