TET Exam : परीक्षा परिषद टीईटी ऑगस्ट महिन्यात घेणार 

परीक्षा परिषदेतर्फे टीईटी घेण्याबाबत तयारी सुरू असून त्यासाठी आवश्यक कार्यशाळा घेण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे टीईटी परीक्षा येत्या ऑगस्ट महिन्यात घेण्याचे नियोजन आहे. 

TET Exam : परीक्षा परिषद टीईटी ऑगस्ट महिन्यात घेणार 
TET Exam

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (MAHARASHTRA STATE COUNCIL OF EXAMINATION)घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेत (Teacher Eligibility Test- TET) घोटाळा (TET Scam)झाल्यानंतर सुमारे अडीच वर्षांपासून टीईटी परीक्षा घेतली गेली नाही.त्यामुळे ही परीक्षा केव्हा घेतली जाणार याकडे अनेक उमेदवार डोळे लावून बसले आहेत.मात्र, परीक्षा परिषदेतर्फे टीईटी घेण्याबाबत तयारी सुरू असून येत्या ऑगस्ट महिन्यात ही परीक्षा घण्याचे नियोजन आहे. त्यामुळे उमेदवारांना आणखी काही दिवस परीक्षेची वाट पहावी लागणार आहे. या वृत्तास राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेडसे (State Examination Council President Dr. Nandakumar Bedse) यांनी दुजोरा दिला आहे.

राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे. काही जिल्ह्यात पात्र उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या असून काही ठिकाणी लोकसभा व विधानपरिषदेच्या आचार संहितेमुळे नियुक्तीची प्रक्रिया रखडली आहे. मात्र,शिक्षण विभागाकडून त्यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. परंतु, टीईटी घोटाळा समोर आल्यावर 2021 नंतर एकही टीईटी परीक्षा घेतली गेली नाही. त्यातच टीईटी परीक्षा ऑनलाईन घ्यावी की ऑफलाईन यावर लवकर निर्णय झाला नाही. मात्र, आता टीईटी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असून त्यादृष्टीने परीक्षा परिषदेतर्फे तयारी केली जात आहे. 

 राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेडसे म्हणाले, परीक्षा परिषदेतर्फे टीईटी घेण्याबाबत तयारी सुरू आहे.त्यासाठी आवश्यक कार्यशाळा घेण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे टीईटी परीक्षा येत्या ऑगस्ट महिन्यात घेण्याचे नियोजन आहे.