कनिष्ठ महाविद्यालयांची झाडाझडती; क्लासेसशी असणारी छुपी युती होणार उघड

शिक्षण विभागाकडून कनिष्ठ महाविद्यालयांचे झाडाझडती घेतली जाणार असल्याने संबंधित क्लास व महाविद्यालयांचे पितळ उघडे पडणार आहे.

कनिष्ठ महाविद्यालयांची झाडाझडती; क्लासेसशी असणारी छुपी युती होणार उघड

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

प्रवेश पूर्व परीक्षांना (Entrance Examination) दिलेल्या अवाजवी महत्त्वामुळे विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयाऐवजी (Junior College) केवळ खाजगी क्लासेसमध्ये (Private Classes) जाऊन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी, बारावीचे नियमित वर्गच भरत नाहीत. अनेक खाजगी क्लासेस आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये छुपे करार झाले आहेत. त्यातून लाखों रुपयांची उलाढाल होते. मात्र,आता शिक्षण विभागाकडून (Education Department) कनिष्ठ महाविद्यालयांचे झाडाझडती घेतली जाणार असल्याने संबंधित क्लास व महाविद्यालयांचे पितळ उघडे पडणार आहे.

इयत्ता बारावी नंतर जेईई, नीट, सीईटी यासारख्या प्रवेश पूर्व परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारेच विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो. पदवी अभ्यासक्रमासाठी इयत्ता बारावीत मिळालेल्या गुणांना जराही महत्त्व राहिले नाही. परिणामी विद्यार्थी व पालकांनी कॉलेजचा रस्ता सोडून केवळ खाजगी क्लासची वाट धरली आहे. त्यामुळे अनेक खासगी क्लासमध्ये विद्यार्थ्यांना पासूनच जागा मिळत नाही, एवढी गर्दी झाली आहे. इयत्ता अकरावीपासूनच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी पुण्यात या खाजगी क्लासमध्ये प्रवेश घेतात. या विद्यार्थ्यांचा इयत्ता अकरावी, बारावीचा मूळ प्रवेश त्यांच्या गावाकडील कनिष्ठ महाविद्यालयात असतो.

राज्यातील १३ जिल्ह्यांतील शिक्षक भरतीबाबत मोठी बातमी; शिक्षण आयुक्तांचे झेडपीला आदेश

एकही दिवस कनिष्ठ महाविद्यालयात न जाता हे विद्यार्थी बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात. वर्षभर केवळ क्लास मध्येच शिक्षण घेतात.
केवळ स्वयं अर्थसहाय्यित किंवा विनाअनुदानित महाविद्यालयांमधीलच नाही तर अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थी सुद्धा खाजगी क्लासमध्ये जाऊन बसत आहेत. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग ओस पडत आहेत. शहरात गल्लोगल्ली उघडलेली खाजगी क्लासची 'दुकाने' थाटली गेली आहेत. परंतु,आता त्यावर नजर ठेवण्यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष पथकांमार्फत अचानकपणे तपासणी केली जाणार आहे.

नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात खाजगी क्लास चालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांमनध्ये असणाऱ्या संबंधाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी शालेय शिक्षण विभागाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र, शासनाने यावर अद्याप कोणताही आदेश काढला नाही. परिणामी कनिष्ठ महाविद्यालयांची 'दुकानदारी' सुरूच आहे.

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत तक्रारी

सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. परंतु, अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी नियमितपणे उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारीची दखल घेऊन पुणे विभागातील कनिष्ठ महाविद्यालयांची प्रत्यक्ष तपासणी करावी, अशी सूचना पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला देण्यात आल्या आहेत.

- संपत सूर्यवंशी, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo