विद्यार्थ्यांजवळ अंमली पदार्थ असल्यास पोलिसांना कळवा ; विद्यापीठाच्या शैक्षणिक संस्थांना स्पष्ट सूचना

विद्यार्थ्यांजवळ अंमली पदार्थविषयक कोणतीही बाब निदर्शनास आल्यास अथवा संशायास्पद परिस्थिती आढळल्यास, याबाबतची सर्व माहिती स्थानिक पोलीस प्रशासनास तातडीने कळवावे.

विद्यार्थ्यांजवळ अंमली पदार्थ असल्यास पोलिसांना कळवा ; विद्यापीठाच्या शैक्षणिक संस्थांना  स्पष्ट सूचना

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे शहरातील (Pune city)समोर येत असलेल्या अंमली पदार्थ सेवनाच्या घटनांच्या (Incidents of drug abuse)पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University)जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले असून याबाबत सर्व शैक्षणिक संस्थांनी दक्षता घ्यावी,असे आवाहन केले आहे.त्याचप्रमाणे महाविद्यालये, परिसंस्था, विद्यापीठ विभाग अथवा उपकेंद्र परिसरातील विद्यार्थ्यांजवळ अंमली पदार्थविषयक कोणतीही बाब निदर्शनास आल्यास अथवा संशायास्पद परिस्थिती आढळल्यास, याबाबतची सर्व माहिती स्थानिक पोलीस प्रशासनास तातडीने कळवावे,(Inform the local police administration immediately)अशा स्पष्ट सूचना विद्यापीठ प्रशासनाने दिल्या आहेत.

विद्यापीठाने प्रसिध्द केलेल्या प्रकाटनानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील संलग्नित सर्व महाविद्यालये आणि परिसंस्थांमधील प्राचार्य, संचालक/केंद्रप्रमुख तसेच विद्यापीठ परिसरातील शैक्षणिक विभागप्रमुख, संचालक यांना कळविण्यात येत आहे की, महाविद्यालये / परिसंस्था, विद्यापीठ विभाग अथवा केंद्र परिसर तसेच विद्यापीठ उपकेंद्र परिसरात अंमली पदार्थविषयक सतर्कता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. वर्तमानपत्रे आणि समाजमाध्यमांमध्ये सध्या तरुणांना अंमली पदार्थ सेवनासाठी प्रवृत्त करुन व्यसनाधिनता निर्माण करणाऱ्या वाढत्या प्रवृत्तींबाबतचे वृत्त प्रसिध्द झाले आहे.
स्थानिक पोलीस प्रशासन अशा प्रकारच्या सर्व समाजविघातक कृतींची दखल गंभीरपणे घेत आहेच. परंतु, सर्व महाविद्यालये, परिसंस्था व विद्यापीठ विभागांनीही आपल्या स्तरावर दक्षता पाळणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांजवळ अंमली पदार्थविषयक कोणतीही बाब निदर्शनास आल्यास अथवा संशायास्पद परिस्थिती आढळल्यास, याबाबतची सर्व माहिती स्थानिक पोलीस प्रशासनास तातडीने कळवणे अनिवार्य आहे.

असेही निदेशित करण्यात येत आहे की, सर्वच विद्यार्थ्यांमध्ये जाणीवजागृती होण्यासाठी आणि अंमली पदार्थ व्यसनांमुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची माहिती देण्यासाठी आवश्यक असे विविध उपक्रम राबविण्यात यावेत. विद्यार्थी अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकू नयेत, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये व्यापक प्रमाणावर प्रबोधन घडवणारे समपदेशनाचे कार्यक्रमही प्राध्यान्याने राबविण्यात यावेत,असे विद्यापीठाच्या प्रकटनात नमूद करण्यात आले आहे.