सैनिकी शाळांच्या शुल्कात 15 हजारावरून 50 हजारापर्यंत वाढ; अभ्यासक्रमही बदलणार

सैनिकी शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे. येत्या  2025 25 या शैक्षणिक वर्षापासून सर्व सैनिकी शाळांमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत सुधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे 

सैनिकी शाळांच्या शुल्कात 15 हजारावरून 50 हजारापर्यंत वाढ; अभ्यासक्रमही बदलणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे सैनिकी शाळांच्या (military school)धोरणात सुधारणा करण्याबाबतचा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अध्यादेशानुसार सैनिकी शाळांच्या वार्षिक शुल्कात 15 हजार रुपयांवरून 50 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यास मंजुरी देण्यात आले आहे. सैनिकी शाळांची शुल्क (Fees of military schools) निश्चिती करून 20  वर्षाहून अधिक कालावधी झाला आहे. हे विचारात घेऊन शासनाने शुल्क वाढीस मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाणार असून सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम (CBSE Board Syllabus)असणार आहे. येत्या  2025 25 या शैक्षणिक वर्षापासून सर्व सैनिकी शाळांमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (State Council of Educational Research and Training- scert ) सुधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. 

राज्यातील अनुदानित सैनिकी शाळांमध्ये 2002 ते 2003 पासून 15 हजार रुपये वार्षिक शुल्क आकारण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर सैनिकी शाळांमध्ये शुल्क निश्चिती केली गेली नव्हती. त्यामुळे शुल्क वाढ करण्यास मान्यता दिली गेली असल्याचे या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. सुधारित सैनिकी शाळांबाबत केंद्र शासनाच्या सैनिकी स्कूल सोसायटीमार्फत संचलित सातारा सैनिकी शाळा, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांचे शैक्षणिक मॉडेल राज्यातील अनुदानित सैनिकी शाळांसाठी स्वीकारण्याबाबत निर्णय राज्य सैनिकी शाळा संनियंत्रण समितीच्या स्तरावर घेण्यात येणार आहे. सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए मध्ये होण्याकरिता शासनाने उपाययोजना सुचविल्या आहेत. 

मोफत गणवेश योजना, प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण, संगणक प्रयोगशाळा, आयसीटी लॅब, खेळांचे साहित्य व क्रीडांगण विकास, ग्रंथालय आधुनिकीकरण हे हॅकेथॉन यासारख्या उपक्रमांना पुढील काळात प्राधान्य दिले जाणार आहे. सैनिकी शाळांचे शैक्षणिक वर्ष एक एप्रिल ते 31 मार्च असे लागू करण्यात येणार आहे.

राज्यातील सैनिकी शाळांमधील सहावी ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम सातारा सैनिकी शाळेच्या धर्तीवर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए प्रवेश, जेईई, जेईई मेन्स,  आयआयटी, एमएच-सीईटी सारख्या परीक्षांचा विचार करता सीबीएससी संलग्न शाळांमध्ये राबविण्यात येणारा एनसीईआरटी अभ्यासक्रम राबविण्यात यावा,असेही अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे.