विद्यार्थी, शिक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया घ्या! स्वच्छ सर्वेक्षणासाठी पालिकेचे विद्यापीठाला पत्र

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम समन्वयकांना नुकतेच याबाबतचे पत्र दिले आहे.

विद्यार्थी, शिक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया घ्या! स्वच्छ सर्वेक्षणासाठी पालिकेचे विद्यापीठाला पत्र
Swachh Survekshan 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यात स्वच्छ सर्वेक्षण २०२३ (Swachh Survekshan 2023) ची सुरूवात झाली असून नागरिकांना आपल्या शहराबाबत ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविता येणार आहेत. पुणे शहरातही (Pune City) हे सर्वेक्षण सुरू झाले असून महापालिकेने सकारात्मक प्रतिक्रियांसाठी थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला (SPPU) साकडे घातले आहे. विद्यापीठाने शहरातील सर्व संलग्न महाविद्यालये व संस्थांना पत्र पाठवून सकारात्मक प्रतिक्रिया नोंदविण्याच्या सुचना दिल्या आहेत. (Savitribai Phule Pune University News)

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम समन्वयकांना नुकतेच याबाबतचे पत्र दिले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत शहरातील स्वच्छता विषयक कामकाजाची सत्यता तपासण्यासाठी शासनाने काही निकष निश्चित केले आहेत व त्याला गुणांकन देण्यात आले आहे.

SPPU News : कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळणार? तोडगा न निघाल्याने दुसऱ्या दिवशीही काम बंद

शहरातील तरुण वयोगट (वय वर्षे १५ ते २९) व ज्येष्ठ नागरिक (वय वर्षे ६० व त्यापुढील) यांचेद्वारे प्राप्त होणाऱ्या ऑनलाईन फीडबॅकला गुणांकन असणार आहे. त्याअनुषंगाने आपले अधिनस्त सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शहरातील सकारात्मक प्रतिक्रिया नोंदविण्याच्या सुचना देण्यात याव्यात. तसेच विद्यार्थ्यांचे कुटुंबीय, मित्र वर्ग यांना याबाबत माहिती देऊन जास्तीत जास्त सकारात्मक प्रतिक्रिया प्राप्त करावयाच्या आहेत, असे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.

राऊत यांच्या पत्रानंतर विद्यापीठाच्या एनएसएसचे प्रभारी संचालक डॉ. सदानंद भोसले यांनी पुणे शहरातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थांच्या संचालकांना पत्र पाठविले आहे. आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शहराविषयी सकारात्मक प्रतिक्रिया नोंदविण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशा सुचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया नोंदविल्यानंतर त्याबाबतचा सविस्तर अहवालाही महापालिकेने पाठविण्यास सांगितला आहे. त्यामुळे तसा अहवाल सर्व महाविद्यालयांना द्यावा लागणार आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात पुणे आघाडीवर आणण्यासाठी सकारात्मक प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी किती प्रतिसाद मिळतो, याबाबत पालिका प्रशासनाला उत्सुकता असेल.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD