शिक्षण संस्थेची बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक

“मी संस्थेत कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होतो. मात्र संस्थेच्या कृष्णकृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी माझ्यावरच खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांचीही दिशाभूल करून न्यायालयात खोटा रिपोर्ट सादर करण्यात आला. पोलिस जेव्हा फाईल जप्तीसाठी आले तेव्हा ते फाईल सोबत घेऊन आले होते, याचे सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे उपलब्ध आहेत,” असे मत तक्रारदार नारायण बढे यांचे आहे.

शिक्षण संस्थेची बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षण संस्थेच्या नावाने बनावट  ७/१२ उतारे व कागदपत्रे (Fake documents in the name of an educational institution) तयार करून शासन व प्रशासनाची फसवणूक (Government and administration fraud)  केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समिती (Kopargaon Taluka Student Assistant Officer) या संस्थेविरुद्ध गैरव्यवहार आणि फसवणुकीचे आरोप उघड झाले आहेत. संस्थेचे अध्यक्ष हिरालाल अर्जुन महानुभाव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून शासन, विविध विभाग, महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप संस्थेचे माजी कर्मचारी देविदास नारायण बढे यांनी केला आहे.

वसतिगृहात रॅगिंग! बेल्ट, बॅट, दांडक्यांनी लहान विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

“मी संस्थेत कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होतो. मात्र संस्थेच्या कृष्णकृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी माझ्यावरच खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांचीही दिशाभूल करून न्यायालयात खोटा रिपोर्ट सादर करण्यात आला. पोलिस जेव्हा फाईल जप्तीसाठी आले तेव्हा ते फाईल सोबत घेऊन आले होते, याचे सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे उपलब्ध आहेत,” असे मत तक्रारदार नारायण बढे यांचे आहे.

संस्थेच्या नावाने "कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समिती चॅरिटी हॉस्पिटल (३०० खाटा असलेले)" अशी भव्य दिव्य हॉस्पिटलची नोंदणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की असे कोणतेही हॉस्पिटल कोपरगाव शहरातील जुन्या टाकळी रोडवर अस्तित्वातच नाही. आरोग्य सेवकांची, डॉक्टरांची वा ३०० खाटा असलेल्या हॉस्पिटलची कोणतीही सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध नसल्याचे बढे यांनी म्हटले आहे.

व्यावसायिक महाविद्यालये फक्त आठ खोल्यांतूनच सुरु आहे. संस्थेच्या नर्सिंग कॉलेज, डी.एड. कॉलेज आणि लॉ कॉलेज यांना शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. मात्र अर्जदारांच्या म्हणण्यांनुसार ही व्यावसायिक महाविद्यालये केवळ आठच खोल्यांत चालवली जात असून, मंजूरी मिळवण्यासाठी दाखवलेली मान्यतापत्रे व इतर कागदपत्रे ही पूर्णपणे बनावट आहेत. ७/१२ उतारा बनावट तयार करून श्री चक्रधर स्वामी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय. कॉलेज) हे ३०० खाटा असलेल्या अस्तित्वहीन हॉस्पिटलच्या जागेत सुरू केलेले आहे, असे बढे यांचे मत आहे.

संस्थेने नॅक मूल्यांकनासाठी सादर केलेल्या SSR रिपोर्टमध्ये देखील खोटी माहिती सादर केली आहे. एवढेच नव्हे तर न्यायाधीश पदावरील व्यक्तीला महाविद्यालयातील शिक्षक म्हणून दाखवण्यात आले आहे. नगरपालिका हद्दीतील सिटी सर्व्हे नं. १६२१ ब, आरक्षण क्रमांक ९२ येथील इमारत "स्वमालकीची" असल्याचे संस्थेने भासवले आहे. त्याचबरोबर त्या इमारतीसाठी दर महिन्याला तब्बल ९० हजार रुपये भाडे दिल्याचे दाखवून शासन व नॅक संस्थेची दिशाभूल केली आहे.

अर्जदार देविदास बढे म्हणतात, “ही सर्व कारस्थाने जाणूनबुजून, पैशांच्या लालसेपोटी करण्यात आली आहेत. जनतेचे, विद्यार्थ्यांचे, शासनाचे आणि नॅक सारख्या प्रतिष्ठित संस्थेचेही प्रचंड नुकसान झाले आहे. या सर्व प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या डॉक्टर, अधिकाऱ्यांवर आणि संस्थाचालकांवर कठोर कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे.” या सर्व प्रकारामुळे कोपरगावातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन खरी चौकशी करून दोषींवर कडकात कडक कारवाई करावी, अशी सर्वसामान्यांचीही मागणी होत आहे.