अखेर राज्य अभ्यासक्रम आराखड्यावर प्रतिक्रियांसाठी दिली मुदतवाढ

शिक्षणशास्त्राचे अभ्यासक किशोर दरक (Kishor Darak) यांनी परिषदेच्या संचालकांकडे मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी परिषदेचे संचालक अमोल येडगे यांनी मुदतवाढ देण्यात आल्याचे जाहीर केले.

अखेर राज्य अभ्यासक्रम आराखड्यावर प्रतिक्रियांसाठी दिली मुदतवाढ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (SCERT) पायाभूत स्तरासाठीचा अभ्यासक्रम आराखड्याचा (State Curriculum Framework 2023) मसुदा तयार करण्यात आला आहे. त्यावर अभिप्राय देण्यासाठी दि. २७ ऑक्टोबरपर्यंतच मुदत देण्यात आली होती. ही मुदत शुक्रवारी (दि. २७) संपत आहे. त्यामुळे आराखड्यावर अभिप्राय नोंदविण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती. यापार्श्वभूमीवर परिषदेकडून आणखी सात दिवसांची मुदत दिली आहे.

 

शिक्षणशास्त्राचे अभ्यासक किशोर दरक (Kishor Darak) यांनी परिषदेच्या संचालकांकडे मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी परिषदेचे संचालक अमोल येडगे यांनी मुदतवाढ देण्यात आल्याचे जाहीर केले. त्यानुसार इच्छुकांना दि. ४ नोव्हेंबरपर्यंत प्रतिक्रिया नोंदविता येणार आहेत. प्राधान्याने https://tinyurl.com/SCF-FS-Responses या लिंकवर प्रतिक्रिया नोंदवता येतील. तसेच scffsresponces@maa.ac.in येथे ईमेलवर सुध्दा आपले अभिप्राय पाठवता येणार आहेत. टपालाद्वारेही अभिप्राय पाठविता येणार असल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे 

शैक्षणिक आराखड्यात असे आहे पूर्व प्राथमिक अन् पहिली-दुसरीचे वेळापत्रक...

 

दरम्यान, राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा प्रसिध्द केल्यानंतर त्यावर २० ते २७ ऑक्टोबर या कालावधीत अभिप्राय मागविण्यात आले होते. पण परिषदेने त्यासाठी दिलेल्या केवळ आठ दिवसांच्या कालावधीवर नाराजी व्यक्त केली जात होती.  याबाबत किशोर दरक यांनी परिषदेच्या संचालकांकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.

 

MSCERT ने २० ऑक्टोबर रोजी 'राज्य अभ्यासक्रम आराखडा - पायाभूत स्तर' (मसुदा) प्रकाशित केला आहे. हा मसुदा प्रसिद्ध करताना लोकांचे प्रतिसाद मागवणे, ही लोकशाही प्रक्रियेला दृढ करणारी, स्वागतार्ह बाब आहे. मात्र यासाठी देण्यात आलेली केवळ एका आठवड्याची मुदत अत्यंत अपुरी आहे, असे दरक यांनी म्हटले होते.  

 

आराखडा ३४० पेक्षा अधिक पानांचा हा व्यामिश्र दस्तऐवज अर्थपूर्ण रितीने वाचून प्रतिसाद नोंदवायचा असेल, तर केवळ सात दिवस हा  कालावधी फार तोकडा आहे. त्यामुळे प्रतिसाद देण्यासाठी किमान ३० दिवसांची मुदत द्यावी. या संदर्भातील माहिती राज्यभरातील सामन्य जनतेला, अभ्यासकांना, तज्ज्ञांना व्हावी, म्हणून वर्तमानपत्रांमधून पुरेशी प्रसिद्दी द्यावी. केवळ समाजमाध्यमांमधून दिली जाणारी प्रसिद्धी प्रतिसाददात्यांच्या संख्येवर मोठी मर्यादा आणू शकते, अशी विनंती दरक यांनी केली होती. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k