राजकीय लोकशाही पेक्षा सामाजिक , आर्थिक लोकशाही प्रस्थापित व्हावी
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
लोकशाहीत संसदेला महत्त्व आहे, पण संसदेपेक्षा संविधान सर्वोच्च (constitution supreme than parliament) आहे. धर्मनिरपेक्षता हे या संविधानाचे वैशिष्ट्ये असून संविधानाची सर्वोच्चता व सार्वभौमत्व जपायला हवे. घटनेतील स्वातंत्र्य , समता, बंधुता (liberty, equality, fraternity) ही मूल्ये पाश्चात्य राष्ट्रातून आलेली नसून ती भारतीय परंपरेनेतून आलेली आहेत. राजकीय लोकशाही पेक्षा सामाजिक लोकशाही, आर्थिक लोकशाही प्रस्थापित व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश पवार (Dr. Prakash Pawar) यांनी केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने 'भारतीय राज्य घटनेचा अर्थ आणि अन्वयार्थ' या विषयावर प्रा. डॉ. प्रकाश पवार बोलत होते. कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. विलास आढाव, महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे आदी उपस्थित होते.
हेही वाचा : संविधान दिन साजरा : समाजातील मुल्ये ही कायद्याला पुरक नाहीत - डॉ. सुखदेव थोरात
डॉ. विलास आढाव , म्हणाले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समता, न्याय, बंधुता यासह सामान्य नागरिक हाच राज्यघटनेचा केंद्रबिंदू मानला. भारतीय समाजव्यवस्थेत धर्म, जात, प्रांत, लिंगभाव आणि वर्ग अशी विविधता आहे. या सर्व विविधतेला एकात्म व एकसंध ठेवण्याचे काम संविधान करत आहे.
डॉ. नितीन घोरपडे यांनी आपण संविधानाने दिलेल्या अधिकारांच्या आग्रहाबरोबर कर्तव्यांचेही पालन केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमच्या सुरुवातीला संविधानाच्या उद्देशिकेचे डॉ. शुभांगी औटी यांनी समूह वाचन केले. कार्यक्रमास डॉ. प्रशांत मुळे, प्रा.अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, डॉ. लतेश निकम, डॉ.सविता कुलकर्णी,डॉ. रमाकांत जोशी, डॉ. नाना झगडे, प्रा. संगीता देवकर, प्रा.अण्णासाहेब निंबाळकर, डॉ. वंदना सोनवले, कार्यालयीन अधीक्षक गणेश साबळे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विशाल झेंडे यांनी केले तर आभार डॉ. लतेश निकम यांनी मानले.
eduvarta@gmail.com