दहावीतील विद्यार्थ्यावर शिक्षिकेकडून लैंगिक अत्याचार; पुण्यातील नामांकित शाळेतील शिक्षिकेला अटक
पुण्यातील गंज पेठ परिसरातील एका नामांकित शाळेतील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यावर शाळेतील शिक्षिकेकडून लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून शालेय विद्यार्थ्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.आता पुण्यातील गंज पेठ परिसरातील एका नामांकित शाळेतील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यावर शाळेतील शिक्षिकेकडून लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन 27 वर्षीय शिक्षिकेने 17 वर्षीय विद्यार्थ्याला स्वतःबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यामुळे संबंधित शिक्षकेवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगा भवानी पेठ येथे राहत असून संबंधित शिक्षिका ही धानोरी परिसरात राहते. विद्यार्थी इयत्ता दहावीच्या प्रिलिम परीक्षेसाठी शाळेत आल्यानंतर संबंधित प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थ्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. याबाबतची माहिती शाळा व्यवस्थापनाला समजल्यानंतर व्यवस्थापनाने शिक्षकेवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.
बदलापूर येथील घटनेनंतर पुण्यात कर्वेनगर परिसरातील नामांकित शाळेतील अनेक विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता गंज पेठ येथील एका नामांकित शाळेत हा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहेत. आत्तापर्यंत बस चालक व शिक्षकाकडून लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असल्याचे आढळून आले होते. परंतु, आता एका शिक्षिकेकडून विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.