बार्टी,सारथी,महाज्योती पीएच.डी. शिष्यवृत्तीवर मंत्रीमंडळात निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी सकारात्मक चर्चा केली.तसेच बुधवारी होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन दिले.

बार्टी,सारथी,महाज्योती पीएच.डी. शिष्यवृत्तीवर मंत्रीमंडळात निर्णय
CM Eknath Shinde with Barti, Sarthi, Mahajyoti student

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

बार्टी, सारथी, महाज्योती (Barti, Sarthi, Mahajyoti) संस्थेच्या माध्यमातून पीएच.डी.संशोधक विद्यार्थ्यांना (Ph.D. Students) दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या प्रलंबित प्रश्नावर मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी सकारात्मक चर्चा केली.तसेच बुधवारी (दि.26) होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन दिले. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाचे सचिव सुमित भांगे (Social Justice and Special Assistance Department Secretary Sumit Bhange) यांच्याशी बार्टी,सारथी,महाज्योतीच्या विद्यार्थी शिष्टमंडळाची बैठक झाली. त्यातही अनुकूल चर्चा झाली. त्यामुळे मंत्रीमंडळ बैठकीत काय निर्णय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य भरातील बार्टी, सारथी, महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी व शिष्यवृत्तीसाठी पुण्यातील महात्मा फुलेवाड्यापासून ते मुंबईतील विधानभवनापर्यंत पायी लॉंगमार्च काढण्यास सुरूवात केली. मात्र, सोमवारी सायंकाळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Rural Development Minister Girish Mahajan) यांनी या आंदोलकांशी मोबाईलवर संवाद साधत यावर संवादातून मार्ग काढण्यासाठी चर्चेसाठी शिष्टमंडळाला निमंत्रित केले. महाजन यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थी शिष्यमंडळाशी प्रलंबित मागण्यावर विस्ताराने चर्चा केली. तसेच बुधवारी सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळात प्रवीण गायकवाड, सीमा वानखेडे, नमिता खरात,तुकाराम शिंदे, गौरव सांगळे,दीपक वस्के,संदीप आखाडे, ऋषिकेश लबडे, नितीन आंधळे आदी विद्यार्थी उपस्थित होते.

तुकाराम शिंदे म्हणाले, राज्य शासनाने बार्टी,सारथी,महाज्योती  संदर्भात 30 ऑक्टोबर 2023 चा अध्यादेश रद्द करावा.तसेच  बार्टीच्या 2022 च्या विद्यार्थ्यांना तर सारथी, महाज्योतीच्या 2023 च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी,अशी मागणी शिष्टमंडळातर्फे करण्यात आली.

नितीन आंधळे म्हणाले, मुख्यमंत्री यांनी सकारात्मक चर्चा केली. तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.त्याचप्रमाणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाचे सचिव सुमित भांगे यांच्याशी सुध्दा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत चर्चा झाली.त्यामुळे बुधवारी सायंकाळी मंत्रीमंडळाच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे आम्हा सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष असणार आहे.