प्राध्यापक,विद्यार्थ्यांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण ; नाटक प्रकरणावर विद्यापीठातील प्राध्यापकांकडून निषेध

समाज विघातक घटकांवर कारवाई होण्याऐवजी त्यांनीच केलेल्या खोट्या तक्रारीच्या आधारे विद्यार्थ्यांना व विभागप्रमुखांना अटक करण्यात आली.ही घटना विद्यापीठाच्या शैक्षणिक स्वायत्ततेवर घाला घालणारी होती.

प्राध्यापक,विद्यार्थ्यांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण ;  नाटक प्रकरणावर विद्यापीठातील प्राध्यापकांकडून निषेध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University)ललित कला केंद्राच्या (Fine Arts Center)आंवारात अंतर्गत परीक्षा सुरु होती.यात विद्यार्थ्यांच्या नाटकाचे मंचन सुरु होते. नाटकाचे पूर्ण मंचन होण्याआधीच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad)विद्यार्थ्यांनी कलाकारांवर हल्ला केला आणि विभागप्रमुखांशी बोलताना अर्वाच्च्य भाषा वापरली.सदर नाटक हे प्रहसन प्रकारात मोडते.त्यातील संदेश हा कोणालाही दुखावणारा नव्हता.या घटनेनंतर हल्ला करणा-या समाज विघातक घटकांवर कारवाई होण्याऐवजी त्यांनीच केलेल्या खोट्या तक्रारीच्या आधारे विद्यार्थ्यांना व विभागप्रमुखांना अटक करण्यात आली.ही घटना विद्यापीठाच्या शैक्षणिक स्वायत्ततेवर घाला घालणारी होती.आम्ही या अटकेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करतो, या आशयाचे निवेदन विद्यापीठातील प्राध्यापकांनी (University Professor) विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी (Vice Chancellor of the University Dr Suresh Gosavi) यांना दिले आहे.

विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. हर्ष जगझाप म्हणाले,अशा घटनांमुळे विद्यापीठातील प्राध्यापक व विद्यार्थी यांमध्ये भीतीचे, दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. अशा वातावरणामध्ये अध्यापन आणि संशोधन करणे कठीण झाले आहे.अभिव्यक्ती व विचार स्वातंत्र्य हे विद्यार्थ्यांच्या, शैक्षणिक संस्थेच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठी अत्यावश्यक अशी बाब आहे. या स्वातंत्र्यावर विद्यापीठ परिसरात हिंसेचा वापर करुन आक्रमण केले जात आहे. ही बाब विद्यापीठातील सर्व घटकांच्या हितास गंभीर बाघा पोहोचवणारी आहे. 

निवेदनाद्वारे प्राध्यापकांनी विविध मागण्या केल्या आहेत. त्यात ललित कला केंद्राचे विद्यार्थी व विभाग प्रमुख यांच्यावरती हेतुःपुरस्सर दाखल केलेल्या पोलिस तक्रारी विरोधात विद्यापीठाने अधिकृत भूमिका घ्यावी व त्यांच्यावरील केसेस काढून टाकण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा.ही घटना विभागामध्ये सेवा बजावत असताना (On duty) झाली असल्या कारणाने विद्यार्थी-प्राध्यापकांच्या न्यायिक प्रक्रियेची संपूर्ण प्रशासकीय आणि आर्थिक जबाबदारी विद्यापीठाने घ्यावी. प्रा.प्रवीण भोळे यांच्या सेवा पुस्तिकेवर सदरील प्रकरणाची कोणतीही नोंद केली जाऊ नये.ज्या समाज विघातक घटकांनी विद्यापीठ परिसरात हिंसाचार केला आणि शैक्षणिक मूल्यमापनात बाधा आणली त्यांच्यावर विद्यापीठाने योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी तातडीने पुढाकार घ्यावा.यांसारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कुलगुर यांनी खबरदारी घेऊन ठोस पावले उचलावीत आणि विद्यापीठातील सर्व घटकांची सुरक्षा अबाधित राहील, याची दक्षता घ्यावी.

 विद्यापीठात शैक्षणिक स्वातंत्र्य अबाधित राहील, याची विद्यापीठाने हमी घ्यावी.या निवेदनाचा सकारात्मक विचार करुन आपण योग्य ती कारवाई कराल, असा आम्हाला विश्वास आहे. या विश्वासास अनुसरुन आपल्याकडून योग्य ती कृती घडली नाही तर आम्हा प्राध्यापकांना आमचे म्हणणे सर्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी संवैधानिक पद्धतीने असंतोष व्यक्त करावा लागेल, याची नोंद घ्यावी,असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.