विद्यापीठात घोटाळ्याचा आरोप; व्यवस्थापन परिषद सदस्यांमधील मतभेद चव्हाट्यावर

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.तर काही व्यवस्थापन परिषद सदस्यांनी यात विद्यापीठाची बदनामी होत असल्यामुळे बोलणे टाळत आहेत.

विद्यापीठात घोटाळ्याचा आरोप; व्यवस्थापन परिषद सदस्यांमधील मतभेद चव्हाट्यावर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University)व्यवस्थापन परिषदेची (management council) मंजुरी नसताना खोटी मंजुरी दाखवून सुरक्षारक्षक घेण्याच्या प्रस्तावास मंजुरी देऊन टेंडर घोटाळा झाल्याचा आरोप (Allegation of tender scam)व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य (management council member Sagar Vaidya)यांनी केला आहे. मात्र,विद्यापीठाकडून हा प्रस्ताव नजर चुकीने आला होता. त्यात कुठलाही घोटाळा झालेला नाही,असे  इतर काही व्यवस्थापन परिषद सदस्य (management council members)सांगत आहेत.त्यामुळे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.तर काही व्यवस्थापन परिषद सदस्यांनी यात विद्यापीठाची बदनामी होत असल्यामुळे बोलणे टाळत आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात सुरक्षा रक्षक नियुक्ती बाबत विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसमोर ठराव सादर करण्यात आला याबाबत सागर वैद्य यांनी आक्षेप घेतला आहे. त्या संदर्भातील पत्र विद्यापीठाला देण्यात आले होते. या पत्रावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सर्व उपस्थित सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र, विद्यापीठाने हा प्रस्ताव मागे घेतल्यामुळे विषय पूर्णपणे संपला होता, असे इतर व्यवस्थापन परिषद सदस्य सांगत आहे.

वैद्य म्हणाले,सुरक्षा रक्षक भरतीचा प्रस्ताव सर्वप्रथम ६ मार्च २०२४च्या सभेत ऐनवेळचा प्रस्ताव म्हणून प्रभारी कुलसचिव डॉ.विजय खरे यांनी ठेवला होता. कोट्यवधींची आर्थिक जबाबदारी असल्याने ऐनवेळी २ ओळीच्या ठरावाने मंजूर करणे योग्य नसल्याने हा प्रस्ताव रीतसर कायद्यानुसार अजेंड्यावर ठेवावा, असे ठरले. मग ९ मार्च २०२४च्या सभेत हा प्रस्ताव अजेंड्यावर आणला गेला. या सभेत महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळ आणि मेस्को या कंपन्यांबद्दल पुन्हा वादग्रस्त चर्चा झाली आणि हा ठराव पुन्हा प्रलंबित ठेवण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. ६ आणि ९ मार्चला चर्चेला आलेला आणि मंजूर न झालेला हा प्रस्ताव २७ फेब्रुवारीला मंजूर दाखवण्याचा बोगसपणा प्रशासनाने केलाच कसा ? आणि कशासाठी ? असा आमचा सवाल आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र विखे पाटील म्हणाले, सागर वैद्य यांनी दिलेल्या पत्रानुसार विद्यापीठाकडून त्याची चौकशी व्हावी.तर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.ज्योत्स्ना एकबोटे म्हणाल्या, विद्यापीठाने सुरक्षा रक्षक नियुक्ती संदर्भातील प्रस्ताव मागे घेतला आहे. तसेच त्या संदर्भातील ई-टेंडरिंग प्रक्रिया करण्यास मान्यता दिली आहे.

--------------------------------------

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुरक्षारक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेचा विषय वादाचा राहिलेला नाही. तो विषय पूर्णपणे संपला असून प्रचलित पद्धतीनुसार सुरक्षारक्षक नियुक्ती बाबत कार्यवाही करण्यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे.

- डॉ. देविदास वायदंडे, सदस्य, व्यवस्थापन परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

---------------------------------------------------------

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडून सुरक्षारक्षक नियुक्ती संदर्भातील प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेसमोर नजरचुकीने आला होता. विद्यापीठाने तो प्रस्ताव मागे घेतला. त्यामुळे त्यात कुठलाही गैरप्रकार झालेला नाही. तसेच सुरक्षारक्षक नियुक्ती बाबत ई-टेंडरिंग करण्यास मान्यता देण्यात आले आहे. त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीमध्ये सदस्य म्हणून माझाही समावेश आहे.
-डॉ.डी.बी.पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

--------------------

व्यवस्थापन परिषेदेचे  "बॅक डेटेड"ने खोटे मंजुरीचे ठराव करून घेत साडे नऊ कोटीचे काम देण्याचा उद्योग करण्यामागे कुणाचे काय हितसंबंध आहेत का ? तसेच, हा आदर्श आचारसंहितेचाही भंग असून विद्यापीठ घटकांची फसवणूक आहे. प्रशासनातील काहींच्या मर्जीतील ठेकेदारांना कामे मिळत नाही असं लक्षात आल्याने निविदा प्रक्रिया न राबविता जुन्याच ठेकेदारांना "मुदतवाढीच्या" नावाखाली कोट्यवधींची कामे आणि बील दिली गेली आहे. या मागे आर्थिक घोटाळे हितसंबंध असल्याच्या संशयाला या बनावट मंजुरी प्रकरणामुळे बळ मिळाले आहे. 
- सागर वैद्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ