मुलींच्या शिक्षणाच्या आड येणाऱ्यांची झाडाझडती; उच्च शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर

राज्यातील सर्व उच्च शिक्षण सहसंचालक आता दररोज दहा महाविद्यालयांना भेटी देणार आहेत. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाच्या आड येणाऱ्या आणि नफेखोरी करणाऱ्या शिक्षण संस्थाचालकांना चाप बसणार आहे.

मुलींच्या शिक्षणाच्या आड येणाऱ्यांची झाडाझडती; उच्च शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील मुलींना व्यावसायीक शिक्षणात (Professional education for girls)सवलत देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी उच्च शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर आला असून राज्यातील सर्व महाविद्यालयांची (All colleges in the state)आता झाडीझडती घेतली जाणार आहे. तसेच शासन निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांच्या निर्देशानुसार आवश्यक कार्यवाही केली जात असून राज्यातील सर्व उच्च शिक्षण सहसंचालक आता दररोज दहा महाविद्यालयांना भेटी देणार आहेत. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाच्या आड येणाऱ्या आणि नफेखोरी करणाऱ्या शिक्षण संस्थाचालकांना चाप बसणार आहे.

राज्य शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी सकारात्मक पाऊल उचलले असून मुलींना शैक्षणिक व परीक्षा शुकातून 100 टक्के सवलत दिली आहे. मात्र, राज्यातील काही शिक्षण संस्था मुलींकडून शुल्क आकारात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या तंत्र शिक्षण विभागासह उच्च शिक्षण विभागाने सुध्दा याबाबत ॲक्शन मोडवर  आले आहे. सर्व शिक्षण सहसंचालकांना दररोज दहा महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थी व महाविद्यालय प्रशासनाशी संवाद साधण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यामुळे कोणत्या महाविद्यालयांकडून आदेशाची अंमलबजावणी केली जात नाही, याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर म्हणाले, राज्यातील आर्थिक दूर्बल घटकातील मुलींना व्यावसायिक शिक्षण घेता यावे या उद्देशाने राज्य शासनाने मुलींच्या शैक्षणिक व परीक्षा शुल्काची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला.या निर्णयाची 100 टक्के अंमलबजावणी करण्यासाठी उच्च शिक्षण विभाग काम करणार आहे.त्यासाठी दररोज 10 महाविद्यालयांना भेटी देण्याच्या सूचना सर्व सहसंचालकांना दिल्या आहेत.तसेच दररोज त्या बाबतचा अहवाल संचालक कार्यालयास पाठवण्याचे आदेश दिले आहेत. मुलींकडून शुल्क आकारणी करणाऱ्या शिक्षण संस्थांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. 
-----------------------------------
दरम्यान तंत्र शिक्षण विभागाने याबाबत परिपत्रक प्रसिध्द केले असून मुलींकडून शुल्क आकारणी करणाऱ्या महाविद्यालयांची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर प्रसिध्द केले आहेत.विद्यार्थी व पालक 796914440  किंवा 796914441 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात.