CBSE डमी शाळांवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून कारवाईचा बडगा; कोचिंग क्लाससाठी पालक निवडात पर्याय 

पालक आपल्या मुलांना कोचिंग क्लाससाठी डमी शाळेत टाकत आहेत.

CBSE डमी शाळांवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून कारवाईचा बडगा; कोचिंग क्लाससाठी पालक निवडात पर्याय 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

एकीकडे केंद्र सरकार NEP अंतर्गत शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन बदल करत असताना देशात डमी शाळांची संस्कृती झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. मान्यता प्राप्त शाळांमध्ये उपस्थिती आणि परीक्षा देणे बांधनकारक असल्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी पालक आपल्या मुलांना या शाळांमधून काढून डमी शाळेत (Dummy school)टाकत आहेत. मात्र आता या शाळांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने CBSE बोर्डाला दिले आहेत.

मीडिया रिपोर्ट नुसार चांगल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी 80 टक्के उपस्थितीचा नियम लागू आहे, पण कोचिंगमुळे विद्यार्थ्याला शाळेत जायचे नसेल तर पालक चांगल्या शाळेतूनही आपल्या मुलांना काढून डमी शाळेत टाकतात. या डमी शाळांमध्ये न जाता विद्यार्थी फक्त कोचिंग क्लास मध्ये जातात, अशा स्वरूपाच्या तक्रारी आल्यानंतर शिक्षण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. 

विशेष म्हणजे या पार्शवभूमीवर CBSE बोर्डाने नुकत्याच देशातील 20 शाळांची मान्यता काढून टाकली होती. यामध्ये महाराष्ट्रातील दोन शाळांचा समावेश आहे. या शिवाय या  20 शाळांमध्ये राजस्थान, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर,  आसाम, मध्य प्रदेश, यूपी, केरळ, उत्तराखंड आणि दिल्ली येथील शाळांचाही समावेश आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण मंत्रालयाने सीबीएसईला मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. आगामी काळात सीबीएसईकडून आणखी कडक तपासणी होणार आहे. शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत कोचिंग क्लास लावता येणार नाहीत, यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित होईल. नियमित उपस्थितीचे निरीक्षण होईल.

या विषयी माहिती देताना भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेच्या उपसचिव संगीता भाटिया म्हणाल्या, “ICSE, ISC बोर्डाने डमी संस्थांविरुद्ध नो टॉलरन्स  धोरण स्वीकारले आहे. अशा शाळांविरोधात तक्रार आल्यास आम्ही त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करू.