पाककलेचे दर्शन घडवत AISSMS ची जागतिक विक्रमाला गवसणी

विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून  २५० मिनिटांत १०० विविध प्रकारच्या करीज् बनवून जागतिक विक्रमाला गवसणी घातली. नुकतीच  'वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड, लंडन' व 'आयुडेक्स वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड' मध्ये या विक्रमाची नोंद झाली.

पाककलेचे दर्शन घडवत AISSMS ची जागतिक विक्रमाला गवसणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

AISSMS : ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी'च्या  हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (hotel management institute) महाविद्यालयाच्या  विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून  २५० मिनिटांत १०० विविध प्रकारच्या करीज् बनवून जागतिक विक्रमाला गवसणी घातली. नुकतीच  'वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड, लंडन' व 'आयुडेक्स वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड' (World Book of Records) मध्ये या विक्रमाची नोंद झाली.

     भारताच्या वैविध्यपूर्ण पाककलेचे व पाकसंस्कृतीचे दर्शन घडविणे तसेच एआयएसएसएम संस्थेचे शताब्दी वर्ष व हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी महाविद्यालयाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा विक्रम रचण्यात आला. यावेळी २५० विद्यार्थी व शिक्षक यांच्या अथक परिश्रम, संघभावना व पाककौशल्यांच्या जोरावर पाककलेचा उत्कृष्ट नमुना सादर करत परीक्षकांना प्रभावित केले. 

"महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक यांनी जागतिक विक्रमाला घातलेली गवसणी ही अभिमानाची गोष्ट आहे. हा केवळ एक जागतिक विक्रम नसून, पाककलेचा उत्सव आहे व याद्वारे आम्ही भारतातील असलेल्या कौशल्यांना व प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचे काम करत आहोत, अशाच वेगवेगळ्या उपक्रमांतून आम्ही ते पुढेही करत राहू", असे हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली जाधव यांनी सांगितले.

" हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी महाविद्यालयाने हा उपक्रम राबविण्याचे हाती घेतलेले शिवधनुष्य लीलया पेलले. त्याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन ! हा जागतिक विक्रम पाककलेसाठी व पाककलेच्या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी नक्कीच सकारात्मक ऊर्जा व प्रेरणा देत राहील ", अशा भावना ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे सचिव मालोजीराजे छत्रपती यांनी यावेळी व्यक्त केल्या. 

महाविद्यालयाचा रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून २५० मिनिटांत २५० विद्यार्थ्यांनी प्रत्येकी २.५ किलोच्या १०० विविध प्रकारच्या करीज् बनवत जागतिक विक्रम केला. त्याचसोबत १२५ खाद्यपदार्थांची परिपूर्ण भारतीय थाळी सादर केली. 

या जागतिक विक्रमाचे परीक्षक म्हणून, राजीव श्रीवास्तव ( राष्ट्रीय उपाध्यक्ष, वर्ल्ड बूक ऑफ इंडिया रेकॉर्ड, लंडन ) तसेच डॉ. अपर्णा देशपांडे ( पाककला विषयतज्ज्ञ) व डॉ. अर्चना बिवाल (राजपत्रित अधिकारी) यांनी उपस्थिती दर्शवली. तसेच या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे  सचिव मालोजीराजे छत्रपती तसेच सुप्रसिद्ध शेफ शैलेंद्र केकाडे व प्राचार्या डॉ. सोनाली जाधव आदी उपस्थित होते.

या जागतिक विक्रमाचा प्रयत्न यशस्वी होण्यासाठी प्राचार्या डॉ. सोनाली जाधव तसेच पाककला विभागप्रमुख डॉ. गौरी शाह यांनी मोलाचे सहकार्य केले.